आकर्षक ऑफरचे आमिष दाखवून 
चाळीस जणांची फसवणूक

आकर्षक ऑफरचे आमिष दाखवून चाळीस जणांची फसवणूक

Published on

पिंपरी : लाइफ टाइम ट्रॅव्हल्स पॅकेजचे तसेच वेगवेगळ्या आकर्षक ऑफर देण्याचे आमिष दाखवून ४० जणांची फसवणूक केल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रहाटणीतील कोकणे चौक येथील सोवनिर इंटरनॅशनल प्रा.लि. कंपनी येथे घडला. या कंपनीचे सनी सोनवणे, गणेश पोपळघाट विशाल दिवाण, मनोज वाल्मीकी, करण शर्मा, मीना शिंदे, आशिष जगताप, पायल दळवी, पल्लवी गावडे, आकांक्षा देशमुख, नागेश साळवी, आयेशा शेख व कंपनीचे इतर कर्मचारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकांत प्रकाश भावसार (रा. कलाटेनगर, वाकड) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादीसह इतर ३९ लोकांना लाइफटाइम मेंबरशिप व लाइफ टाइम ट्रॅव्हल्स पॅकेज देण्याचे तसेच वेगवेगळ्या आकर्षक ऑफर देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर बनावट ॲग्रिमेंट बनवून फिर्यादी तसेच ३९ लोकांची एकूण २९ लाख १६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. काळेवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : घरसामान बिहार येथील घरी पोहोचवितो, असे सांगून सामान घेतले. मात्र, नंतर ते घरी न पोहोचविता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार नेरे दत्तवाडी येथे घडला. याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनुकल्प कुमार ओझा व एका अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना त्यांचे घरगुती सामान पुणे येथून बिहार येथे पोहोचवतो, असे सांगून भाड्याचे बारा हजार रुपये घेतले. मात्र, नंतर सामान बिहार येथील घरी न पोहोचवता फिर्यादी यांची फसवणूक केली.
---

Marathi News Esakal
www.esakal.com