पीएमपी बस थांबवत नसल्याने चालकाला मारहाण

पीएमपी बस थांबवत नसल्याने चालकाला मारहाण
Published on

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बस थांबवत नसल्याने तिघांनी मिळून बस चालकाला मारहाण केली. ही घटना हिंजवडी-माण रस्त्यावर घडली. याप्रकरणी विकास दयाकर गायकवाड (रा. मुकाई चौक) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भागवत उत्तम त्रिंबके (वय २५), दिगंबर कुंडलिक त्रिंबके (वय ५२, रा. गवारेवाडी, फेज तीन, माण) आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे पीएमपी बसचालक असून, ते हिंजवडी-माण रस्त्याने कामासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ते हिंजवडी-माण रस्त्यावर बस थांबवत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना आणि त्यांचे सहकारी लक्ष्मण साबळे यांना सिमेंट ब्लॉकने मारहाण करून जखमी केले.

भरधाव टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पिंपरी : भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना मारुंजी रस्त्यावर घडली. विद्या काळुराम जाधव (वय ४७) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी काळुराम गुलाब जाधव (रा. मेमाणेवस्ती, नेरे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेम्पोचालक प्रवेश यादव (वय २५, रा. वापी, गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी जाधव हे त्यांच्या पत्नी विद्या यांच्यासह दुचाकीवरून जात होते. दरम्यान, आरोपीने त्याच्या ताब्यातील भरधाव टेम्पोने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादी गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.

गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका महिलेला पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई निगडीतील ओटास्कीम येथे करण्यात आली. ओटास्कीम येथे एक महिला गांजा विकत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. महिलेकडून १९ हजार ८१० रुपये किमतीचा गांजा तसेच रोख रक्कम जप्त केली.

जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना काळेवाडी येथील कोकणेनगर येथे घडली. याप्रकरणी काळेवाडीतील कोकणेनगर येथील व्यक्तीने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मल्लिनाथ विजयकुमार पाटील (रा. कोकणेनगर, काळेवाडी) आणि सुनील इरन्ना पाटील (रा. घरकुल, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीच्या घरासमोर आले. फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी मल्लिनाथ याने लोखंडी फायटरने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. यासह पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
---

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com