संवाद माझा
तारेचे कंपाउंड हटवा
ताम्हणे वस्ती येथील गणेश मंदिराजवळील जरे कॉर्नर या इमारतीसमोर मुख्य रस्त्यावर तारेचे कंपाऊंड घालण्यात आले आहे. मात्र, त्याने वाहतूक कोंडी, अपघाताचे प्रसंग व नागरिकांना त्रासदायक परिस्थिती निर्माण होत आहे. वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या भागातून शालेय वाहने, रुग्णवाहिका, व अवजड वाहने देखील नियमितपणे ये-जा करत असतात. मात्र पादचाऱ्यांनाही रस्ता पार करणे कठीण झाले आहे. म्हणून हे तारेचे कंपाऊंड त्वरित काढून टाकण्यात यावे. अथवा दुसऱ्या सुरक्षित जागी हलवण्यात यावे.
- निर्गुण थोरे, चऱ्होली
PNE25V36665
स्वच्छतागृह खुले करा
वाकडच्या कावेरीनगर पोलिस वसाहतीजवळील कावेरीनगर भाजी मंडई येथे महापालिकेने बांधलेले स्वच्छतागृह बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. त्याभोवती भाजीवाल्यांच्या गाड्या बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या असतात. स्वच्छतागृहापर्यंत जाण्यासाठी रस्ता पण ठेवलेला नसतो. या स्वच्छतागृहाचा वापर ठराविक भाजी विक्रेते स्वतः ची खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे करतात. त्याला कुलूप लावून चावी स्वतः कडे ठेवतात. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
- सुहास होनराव, चिंचवड
PNE25V36659
विकास करा; पण हसे नको
पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या उजव्या बाजूस सूर्यनगरी सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर अंदाजे २०० मीटर लांबीचा रस्ता आहे. त्यावर रस्ते वाहतूक संकेत चिन्हे दर्शक १५ फलक आहेत. अशा प्रकारचे फलक लावणे उचित असले तरी ते योग्य ठिकाणी व योग्य पद्धतीने लावले गेले नाही; तर त्याचा उद्देश साध्य होत नाही. ती केवळ औपचारिकता ठरते. येथे दोन थांबा लिहिलेले फलक एका शेजारी एक लावले आहेत. ‘रस्ता ओलांडणारा पादचारी’चे सहा फलक आहेत. ‘पुढे चौक आहे’ असे दर्शविणारे चार फलक आहेत. महापालिकेने विकास जरूर करावा; पण त्याचे हसे होऊ देता कामा नये. इतकीच अपेक्षा.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V36664
सिग्नल तातडीने बसवा
मोशी - आळंदी रस्त्याने येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांची संख्या आता वाढलेली आहे. त्यात लक्झरी बस, अवजड वाहने, टेंपो, मोटारी, रिक्षा तसेच दुचाकी वाहने ये - जा करत असतात. डुडूळगाव येथील या रस्त्यावर पुणेरी स्वीट कॉर्नर येथे मोठा चौक आहे. या चौकात पादचाऱ्यांची वर्दळही खूप असते. सिग्नल नसल्याने चौकात अनेकदा अपघात झाले आहेत. भविष्यात येथे मोठे जीवघेणे अपघात होऊ शकतात. प्रशासनाने या चौकात त्वरित सिग्नल बसवावेत.
- दिलीप पाटील, गोविंदबाग, डुडूळगाव
PNE25V36662
सिग्नलच्या वेळेत बदल आवश्यक
ताथवडे चौकातील सिग्नलला उजवीकडे वळण्यासाठी फक्त १५ सेकंद वेळ ठेवली आहे. रावेतच्या दिशेने येणारी बरीचशी वाहने हिंजवडीला जाण्यासाठी ताथवडे चौकात उजवीकडे वळतात. परंतु सिग्नलचा वेळ अत्यंत कमी असल्याने वाहने पुढे जाईपर्यंत डांगे चौकाच्या दिशेने येणाऱ्या बाजूचा सिग्नल चालू होतो. त्यामुळे वाहने मध्येच थांबवावी लागतात. बीआरटीमधून देखील बस तसेच खासगी वाहने मध्येच येऊन थांबतात. मुख्य चौक असून देखील कधीच वाहतूक पोलिस येथे उपलब्ध नसतात. तरी संबंधित विभागाने येथील सिग्नलच्या वेळा पुन्हा निर्धारित कराव्यात. डांगे चौकाला सरळ व ताथवडेला उजवीकडे जाणारा सिग्नल एकाचवेळी सुटेल, अशी सोय करावी. किमान गर्दीच्यावेळी वाहतूक नियोजन करण्यासाठी अधिकारी नियुक्त करावेत.
- श्रीकांत हिंगमिरे, रावेत
PNE25V36666
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.