वाचक लिहीतात
वाचक लिहितात
---
राजकीय नेत्यांचा
चौपाट्यांवर वरदहस्त
‘सकाळ’मधील चौपाटीवरील मालिकेत वस्तुस्थिती मांडली आहे. त्याबद्दल आभारी आहे. मोरया गोसावी मंदिराजवळही एक चौपाटी आहे. तेथे साबुदाणा वडा खाताना अळी सापडली. ही चौपाटी लांबून स्वच्छ वाटते, पण तेथील विक्रेते ताटल्या नीट धूत नाहीत. तेथे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी ट्रॅफिक होते. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहासमोरील चौपाटीमध्ये तर झुरळे व उंदीर दिसतात. ग्राहकांनी वापरलेल्या ताटल्या तशाच पुसून त्यात प्लॅस्टिकचा कागद टाकून त्यावर खाद्यपदार्थ दिले जातात. पदार्थ बनविणारे आचारी ‘अॅप्रन’, हातमोजे, ‘हेअर कॅप’ अशा कोणत्याही गोष्टी वापरत नाहीत. पिंपरी-चिंचवडमधील सर्व चौपाट्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने चालतात. तेथे मोठा आर्थिक व्यवहार सुरू असतो. त्यामुळे खरी कसोटी प्रशासनाची आहे.
- ओमकार शिंदे, चिंचवड
---
अधिकाऱ्यांनी कारवाई करावी
‘अस्वच्छतेचा कहर खाताय उघड्यावरचे जहर’ यातील सर्व बातम्या वाचल्या. हे धक्कादायक वास्तव आहे. माझ्या मते खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण किती आहे, याची कडक तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. भेसळ असलेले पदार्थ सापडल्यास ते स्टॉल बंद केले गेले पाहिजेत. नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने हे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याची खेळ करणाऱ्या विक्रेत्यांवर बंदी घालणे गरजेचे आहे.
- रमेश देव, चिंचवड
----