भेसळीची सर्रास सरमिसळ
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २ ः पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त तसेच निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याच्या या प्रकाराबाबत अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) मात्र कारवाईबाबत उदासीन दिसत आहे.
सहा महिन्यांत ११२ जणांच्या तक्रार येऊनही ‘एफडीए’ने केवळ चारच जणांचे परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ग्राहकांना निर्भेळ अन्न व अन्नपदार्थ मिळावेत म्हणून राज्यात २०११ पासून नवीन अन्न सुरक्षा व मानके कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्यात अन्न उत्पादक, पॅकर, घाऊक विक्रेते, वितरक आणि अन्नविक्रेते यांचा समावेश होतो. सणासुदीच्या काळात खवा, मिठाई, पनीर, श्रीखंड, ताक, दही तसेच इतर पदार्थांची मागणी वाढत असते. त्यावेळी याच काळात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ बनविणारे कारवाया करीत असतात. खवा, पनीर किंवा मीठायांमध्ये भेसळयुक्त पदार्थ मिसळले जातात. त्याशिवाय तेल, मसाले आणि इतर वस्तूंमध्ये सुद्धा भेसळ केली जाते.
पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्हयात भेसळीचे प्रकार सर्रास घडतात. घाऊक तसेच किरकोळ विक्रेतेही निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विकतात. पॅकिंग करताना सफाई आणि स्वच्छतेची अजिबात काळजी घेतली जात नाही. प्रशासन मात्र कारवाई करीत नसल्याने भेसळ करणाऱ्यांना आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांना जणू काही अभयच मिळत आहे.
-------
अहवाल मिळण्यास उशीर
राज्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईत विक्रीच्या दृष्टीने संशयास्पद आढळलेल्या अन्नपदार्थांच्या नमुन्यांचा अहवाल संबंधित प्रयोगशाळेकडून प्रशासनाला १४ दिवसांत मिळण्याची तरतूद कायद्यात आहे. प्रत्यक्षात कारवाईनंतर प्रयोगशाळेकडे पाठवलेला अन्नपदार्थांचा अहवाल सहा महिने उलटले तरी येत नाहीत. त्यामुळे अनेकदा भेसळ करणारे विक्रेते, पुरवठादार, उत्पादकांना कायद्यातून पळवाट काढणे सोपे जाते.
----
‘एफडीए’च्या सुरक्षा अधिकाऱ्याकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमीत तपासणी करण्यात येते. कमी दर्जाचे, बनावट आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास कारवाई केली जाते. नागरिकांच्या तक्रारी आल्यावर प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अन्नपदार्थांचे नमुने घेतले जातात. ते तपासणीसाठी पाठविले जातात. अहवाल आल्यावर संबंधितांवर कारवाई केली जाते.
- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त (अन्न), ‘एफडीए’
-----------
तक्रारींचा तपशील
नागरिकांच्या तक्रारी ः ११२
तक्रार निवारण ः १०८
प्रलंबित तक्रारी ः ४
परवाना निलंबन - ४
-------
कारवाईचा तपशील
अस्थापनांची तपासणी ः ७२५
अन्नपदार्थांचा साठा जप्त ः ६८४०३ किलो
अन्नाचे नमुने ः ७३५
अहवाल प्राप्त ः ७१०
आढळलेले कमी प्रतीचे नमुने ः ५९
असुरक्षित अन्न नमुने ः ३८
लेबलमधील त्रुटी ः ३७
९१ प्रकरणांत आकारलेला दंड ः ८ लाख ३६ हजार ६०० रुपये
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.