बदलत्या काळात मूल्य टिकणे आवश्यक
पिंपरी, ता. ३ : ‘‘आजच्या युगात बदलती जीवनशैली ही केवळ व्यक्तीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंब व्यवस्थेवर प्रभाव टाकत आहे. विशेषतः आपली कुटुंबसंस्था अनेक आव्हानांना सामोरी जात आहे,’’ असे मत सामाजिक कार्यकर्त्या नयना सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे आयोजित ‘बदलती जीवनशैली व हिंदू कुटुंबापुढील आव्हाने’ विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी सहस्रबुद्धे, विश्वनाथन नायर, अश्विनी अनंतपुरे, वैदेही पटवर्धन व अनघा कानडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहस्रबुद्धे यांनी शहरीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक, सामाजिक माध्यमांचा प्रभाव, नातेसंबंधातील दुरावा आणि परंपरागत संस्कारांचा अभाव आदी मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पल्लवी कोंडेकर यांनी सूत्रसंचालन, अश्विनी अनंतपुरे यांनी प्रास्ताविक, शीतल गोखले यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.