पिंपरी चिंचवड अप्‍पर तहसील अडगळीत

पिंपरी चिंचवड अप्‍पर तहसील अडगळीत

Published on

पिंपरी, ता. ४ : शहरातील अप्‍पर तहसील कार्यालयात सध्या जागेच्या कमतरतेमुळे कार्यक्षमता आणि कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच अपुरा कर्मचारी वर्ग हे कामकाजात अडथळे ठरत आहेत. नागरिकांच्या दैनंदिन कामकाजासाठी सुरू असलेले हे कार्यालय सध्या निगडीतील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी मर्यादित जागेत कार्यरत आहे. ही जागा अत्यंत अपुरी असून कार्यालयीन कामकाज आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा येथे नसल्याने खोळंबा होत आहे.

चिखली परिसरात जवळपास २० गुंठ्यांची जागा तहसील कार्यालयासाठी प्रस्तावित होती. हा प्रस्ताव सुमारे तीन वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता. मात्र, आजतागायत त्यावर ठोस अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, कार्यालयाचे स्वतंत्र व सुसज्ज इमारत असण्याचे स्वप्न अपूर्णच आहे. यामुळे स्थानिक प्रशासनासह नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. प्रस्‍ताव जुना असल्‍याने नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्‍याबाबत माहिती मिळत नाही. सध्या अप्‍पर तहसील कार्यालयात एक नायब तहसीलदार, एक अव्वल कारकून आणि आठ लिपीक आहेत. इतक्या मर्यादित कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कार्यालयीन भार येतो. जागेच्या अभावामुळे कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कार्यालयाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी आधुनिक व सुसज्ज इमारतीची नितांत गरज आहे. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असताना हे महत्त्वाचे कार्यालय अजूनही प्राथमिक सुविधांपासून वंचित असणे हे प्रशासनाच्या नियोजनशून्यता दर्शवते. आता हा प्रस्ताव कधी मार्गी लागणार असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

नवीन कार्यालयाबाबत चिखलीतील जागेचा विचार सुरू आहे. अद्याप त्‍याबाबत कार्यवाही झालेली नाही. पण, शासन निर्णय कधी होईल, त्‍यानुसार पुढील कार्यवाही होईल.
- जयराज देशमुख, अप्‍पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड.

कार्यालयातील अडचणी
- नागरिकांना बसण्यासाठी व तक्रारी नोंदवण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था नाही.
- काही वेळा तर नागरिकांना तासन्‌तास उभे राहूनच कामकाज उरकावे लागते.
- तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनाही सध्या अडगळीच्या जागेतच बसावे लागत आहे.
- स्वच्छता, दस्तावेजांची मांडणी, फाइल्सचे व्यवस्थापन यावर परिणाम होत आहे.

PNE25V37191

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com