गुन्हे वृत्त
मुळशीत विवाहितेची आत्महत्या
पिंपरी : किरकोळ घरगुती कारणावरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करीत मानसिक व शारीरिक छळ केला. त्याला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मुळशी तालुक्यातील पिरंगुट व लवळे येथे घडली.
समीना सुलतान शेख (वय २०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सुलतान रमजान शेख व रमजान शेख (रा. लवळे, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर लायक रमजान शेख याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अब्दुलनबी रज्जाक (रा. गांधी चौक, यादगीर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांची मुलगी समीना शेख यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला.
खंडणी प्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बीएसएनएल इंटरनेट लाइन टाकल्याच्या कारणावरून खंडणी मागणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार चऱ्होली येथे घडला. स्वप्नील राजाराम तापकीर (वय ३३, रा. चऱ्होली बु., ता. हवेली, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी तुषार बाळासाहेब ठाकूर (रा. सोळू, ठाकूर वस्ती, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चऱ्होली फाटा येथे ‘बीएसएनएल इंटरनेट सेवेची लाईन कोणाला विचारून टाकली, तो एरिया माझा आहे. त्यासाठी मला ५० हजाराची खंडणी द्यावी लागेल’, असे आरोपी म्हणाला. तडजोडीअंती दहा हजार रुपये बँकेत खंडणी म्हणून घेतले. उर्वरित पैसे न दिल्याने आरोपीने इंटरनेट लाइन तोडून ९० हजार रुपयांचे नुकसान केले.
मोटारीची रिक्षाला धडक; एकजण जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना चऱ्होली येथे घडली. सचिन आनंदराव सोरटे असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील आनंदराव दादू सोरटे (रा. साईनाथ कॉलनी, भोसरी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवराज दशरथ करपे (रा. वडमुखवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ताजणे मळा रस्त्यावर सचिन सोरटे हा रिक्षाने प्रवास करत असताना हा अपघात घडला.
भोसरीत गांजासह तरुणाला अटक
पिंपरी : गांजाची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाख दोन हजाराचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई भोसरी येथे करण्यात आली. रमेश हरीश राठोड (वय २५, रा. कात्रज, पुणे, मूळ- रा. कोडगंल, तेलंगणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मच्छी मार्केटजवळ आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन किलो ३५ ग्रॅम वजनाचा, दोन लाख दोन हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.
गुटखा विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भोसरी एमआयडीसी परिसरात करण्यात आली. कमल लुणकरनजी राठी (वय ४८, रा. एमआयडीसी भोसरी) व राजू सिरवी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नवे आहेत. राज पान शॉप येथे तपासणी दरम्यान ३६ हजार ३२५ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. आरोपी हा गुटखा साठवणूक व विक्री करत होता. दुसरा आरोपी राजू सिरवी सध्या फरार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.