स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य ‘महाग’

स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य ‘महाग’

Published on

पिंपरी, ता. ४ : पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेची जबाबदारी असलेले स्वस्त धान्य दुकानदार स्वतः आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. सरकारी योजनेंतर्गत जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य पुरवणाऱ्या दुकानदारांना तुटपुंजे कमिशन मिळते. कोणतीही आरोग्यसेवा मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शहरात २५४ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. पाच वर्षांपूर्वी ही संख्या ४५०च्या घरात होती. आता ती निम्म्यापेक्षा जास्त कमी झाली आहे. कमी उत्पन्न, वाढती जबाबदारी आणि आरोग्यसुविधांचा अभाव अशी यामागील कारणे असल्याचे ‘ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस असोसिएशन’चे पदाधिकारी सांगतात. त्यामुळे खासगी रुग्णालयात मोफत प्राथमिक उपचार मिळावेत अशी त्यांची मागणी आहे.
सध्या एका किलो धान्य वाटपावर फक्त दीड रुपये कमिशन मिळते. एखाद्या दुकानदाराने १०० किलो धान्य वितरित केले तरी त्याला फक्त १५० रुपये मिळतात. या उत्पन्नावर दुकान चालवणे, भाडे, विजेचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार असा भार पेलणे कठीण होते. त्यामुळे काही दुकानदारांनी व्यवसाय सोडून दिला असून उरलेल्यांनाही तग धरताना अडचणी येत आहेत.
अनेक दुकानदार ५० ते ७० वयोगटातील आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी अशा आजारांनी ते त्रस्त आहेत. ‘आम्हाला कोणतेही आरोग्य सुरक्षा कवच नाही. सरकारी आरोग्य योजना केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरत्या मर्यादित आहेत. आम्हीही सुद्धा शासनाच्या योजनेंतर्गत काम करतो, मग आमच्यासाठी कोणतीच तरतूद का नाही,’ असा सवाल संघटनेच्या प्रतिनिधींनी केला आहे.
---
दुकानदारांची संख्या
पिंपरी - ७७
चिंचवड - ९१
भोसरी - ८६
---
शासनाने आरोग्य कार्डसारखी सुविधा द्यायला हवी. जेणेकरून किमान खासगी रुग्णालयात किंवा महापालिका रुग्णालयातही काही आजारांसाठी मोफत उपचार होतील. त्‍याबाबत प्राधान्‍याने विचार व्‍हावा.
- मनसुखलाल चौधरी, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार
---
सध्या अनेक स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. अनेक जण मधुमेह, उच्‍च रक्‍तदाबाने त्रस्‍त आहेत. त्‍यांना प्राथमिक उपचार मिळणेही कठीण होते. आम्हाला खासगी रुग्णालयात उपचार घेणे भाग पडते, पण प्राथमिक उपचार मोफत मिळावेत.
- विक्रम छाजेड, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com