तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
पिंपरी : एका महिलेशी बोलत असल्याचा राग आल्याने एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही घटना थेरगाव येथील नखातेनगर येथे घडली. दिलीप हुलराम सूर्यवंशी (वय २४, रा. नखातेनगर, थेरगाव) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सेलवराज अंहंडी थेवर (वय ५१, रा. नखातेनगर, थेरगाव) याला अटक केली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे गप्पा मारत होते. त्यावेळी एका महिलेशी बोलत असल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीशी वाद घातला. त्यानंतर आरोपीने ‘मैं तुमको अभी जिंदा नहीं छोडूंगा’ असे म्हणत फिर्यादीवर चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
पैशाच्या वादातून दोघा भावांवर कटरने वार
पिंपरी : उसने घेतलेल्या पैशांवरून वाद घालत एकाने दोघा भावांवर कटरने वार करून प्राणघातक हल्ला केला. ही घटना भोसरीतील लांडेवाडी येथील विकास कॉलनी येथे घडली. ऋषिकेश शरद कुबल (वय ३८, रा. मांजरी, पुणे) व राहुल कुबल अशी जखमी झालेल्या भावांची नावे आहेत. याप्रकरणी ऋषिकेश यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिल बबन घोलप (वय ५०, रा. चऱ्होली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ऋषिकेश व त्यांचा भाऊ राहुल हे दोघेजण लांडेवाडी येथे एका कामानिमित्त आले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने ‘माझे हात उसने घेतलेले पैसे कधी देतो, तुला आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणत फिर्यादीच्या गळ्यावर कटरने वार केला. त्यानंतर फिर्यादीच्या भावाच्या गालावरही कटरने वार करून दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
भरधाव मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू
पिंपरी : घरासमोर खेळत असलेल्या दोन वर्षीय बालिकेला भरधाव मोटारीने धडक दिली. यामध्ये दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना रहाटणीतील शिवराजनगर येथे घडली. सुकन्या शिवराज देवरे (वय २) असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी सुकन्या हिचे वडील शिवराज जळबा देवरे (वय २४, रा. शिवराजनगर कॉलनी नं. २ रहाटणी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जय योगेशकुमार लाठीवाला (रा. साई मिरॅकल सोसायटी, शिवराजनगर, रहाटणी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुकन्या ही घरासमोर खेळत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटार निष्काळजीपणे चालवून सुकन्या हिला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. काळेवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सायकल चोरीप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली सायकल चोरल्याप्रकरणी एकाला चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही घटना चिंचवडमधील श्रीधरनगर येथे घडली. संतोष राजू मोरे (वय ३५, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संकेत माधव झानपुरे (रा. श्रीधरनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मुलाची १६ हजार ८७५ रुपये किमतीची सायकल आरोपीने सोसायटीच्या पार्किंगमधून चोरली होती. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली.
पीएमपी बसचालक, वाहकाला मारहाण
पिंपरी : पीएमपी बसचालक व वाहकाला दुचाकीस्वारांनी मारहाण केली. ही घटना म्हाळुंगे येथे घडली. गजानन कांबळे व आकाश गायकवाड (दोघेही रा. महादेव मंदिराजवळ, म्हाळुंगे, ता. मुळशी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास सूर्यभान अकोलकर (रा. ग्रीन हिल कॉलनी, म्हाळुंगे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील बस प्रवाशांसह घेऊन जात होते. दरम्यान, बसने धडक दिल्यामुळे आपली दुचाकी पडली, या गैरसमजातून आरोपींनी संगनमत करून वाहक विकास अकोलकर आणि चालक हिमाशील जोहरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.