होसान्ना... होसान्ना...
पिंपरी, ता.१३ : "होसान्ना... होसान्ना...(आमचे तारण कर) ! प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो ! अशा घोषणा देत प्रभू येशूचा जयजयकार करत पिंपरी चिंचवड शहरातील विविध चर्चमधून झावळ्याचा रविवार म्हणजेच ‘पाल्म संडे'' हा सण रविवारी (ता.१३) हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यानिमित्त ख्रिस्ती बांधवांनी हातामध्ये झावळ्या घेऊन सुवार्ता फेरी काढली.
प्रभू येशू ख्रिस्ताने यहुद्यांचा राजा म्हणून येरुशलेम शहरात जयोत्सवाने प्रवेश केला. तेथील समुदायाने वस्त्रे जमिनीवर टाकून व हातात झावळ्या घेऊन होसान्नाच्या घोषणा देत येशूचे स्वागत केले. त्या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण जगभर ख्रिस्ती बांधव झावळ्याचा रविवार साजरा करतात. हा दिवस येशूला वधस्तंभावर देण्याच्या आधी साजरा केला जातो. शहरातील चर्चमध्ये सकाळी आठ वाजता झावळ्याचा रविवारचा संदेश दिला. त्यानंतर चर्चमधून हातात झावळ्या घेऊन, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना’, परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो, असे बायबलमधील वचनांचे फलक घेऊन ख्रिस्ती बांधवांनी शहरातील प्रमुख चौक आणि नागरी वसाहतीमधून सवाद्य प्रभातफेरी काढली. शहरातील बहुतांश चर्चचे धर्मगुरू आणि ख्रिस्ती बांधव हातात झावळ्याची पाने आणि त्यावर क्रॉस चिन्ह घेऊन सुवार्ता फेरीत सहभागी झाले. या फेरीत प्रभू येशू यांच्या वचनांची माहिती नागरिकांनी दिली जात होती. होसान्ना ! होसान्ना ! असा जयघोष यावेळी करण्यात आला. शहराच्या विविध भागांतून मार्गक्रमण करत असता प्रमुख चौकांमध्ये धर्मगुरूंनी झावळ्याच्या रविवारसंबंधी माहिती देत प्रभू येशूचे स्मरण केले. शहर व उपनगरांतील विविध चर्चतर्फे काढण्यात आलेल्या सुवार्ता फेरीत धर्मगुरूंसहित अबालवृद्ध सहभागी झाले. या दिवसापासून ख्रिस्ती समाजाचा पवित्र सप्ताह सुरू होतो. या आठवड्यात गुड फ्रायडे, मौंदी गुरुवार, ईस्टर संडे, अंजिराचा सोमवार हे महत्त्वाचे दिवसही साजरे करण्यात येतात, असे पास्टर सिल्वे यांनी सांगितले. शेवटी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

