

पिंपरी, ता.१८ ‘‘पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला खांबावरी....क्रुसास येशू टांगला अर्पिलेला कोकरा... येशूच्या रक्ते भरले...तेरा लहू बडी किमती है प्रभू...’’ असे उपासनागीत सादर करत ‘उत्तम शुक्रवार’ (गुड फ्रायडे) निमित्त पिंपरी चिंचवड शहरात ख्रिस्ती बांधवांनी वधस्तंभावरील येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनाचे स्मरण केले.
क्रुसावर येशू ख्रिस्तांनी उच्चारलेल्या सात वाक्यांचे मनन करून व एकत्रित प्रार्थना म्हणून विविध भागांतील चर्चमध्ये भावपूर्ण वातावरणात उपासना करण्यात आली. या निमित्त अनेक चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील अखेरचा प्रवास नाट्यरुपाने सादर करण्यात आला.
आकुर्डी, चिंचवड, पिंपरीगाव, पिंपरी कामगारनगर, निगडी, रावेत, भोसरी, दापोडी, खडकीसह शहराच्या विविध भागांमधील चर्चमध्ये सकाळी आठ वाजल्यापासूनच ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली होती. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रार्थनेला प्रारंभ झाला. ‘गुड फ्रायडे’चा संदेश ऐकण्यासाठी शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या उपासनेनंतर ख्रिस्ती बांधवांच्या सुरू असलेल्या चाळीस दिवसांच्या उपवासाची (लेन्टेन सिझन) सांगता झाली.
वधस्तंभावरील उच्चारलेले सात वाक्य
शहरातील कॅथलिक आणि प्रोटेस्टंट चर्चमध्ये बिशप व धर्मगुरूंनी बायबलमधील ‘‘हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही’’, ‘‘तू आज मजबरोबर सुख लोकात असशील’’, ‘‘बाई पाहा हा तुझा मुलगा, पाहा ही तुझी आई’’, ‘‘माझ्या देवा, माझ्या देवा तू माझा त्याग का केला?’’, ‘‘मला तहान लागली आहे’’, ‘‘पूर्ण झाले आहे’’, ‘‘हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो’’ या सात वाक्यांवर मनन करण्यात आले.
दि युनायटेड चर्च ऑफ ख्राइस्ट
कामगारनगर येथील दि युनायटेड चर्च ऑफ ख्राइस्ट या चर्चमध्ये प्रेसबिटर-इन-चार्ज अलायन्स चर्च, जळगावचे रेव्हरंड शशिकांत वळवी यांच्या उपस्थितीत उपासना पार पडली. त्यांनी संदेश देताना ‘गुड फ्रायडे’ हा प्रत्येक मानवाचा विजयी झालेला दिवस आहे. प्रत्येक मनुष्याचा शापमुक्तीचा व तारणाचा दिवस आहे. ‘गुड फ्रायडे’ म्हणजेच शैतानाचा नाश आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा विजय आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो विजयी जीवन जगतो, यावर संदेश दिला. चर्चच्या युथ ग्रुपतर्फे युवक - युवतींनी भक्तिगीत सादर केले. भक्ती चालक सुषमा वाघ होत्या.
सेंट जोसेफ चर्च
आकुर्डी येथील सेंट जोसेफ चर्चने येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचे आणि क्रॉसवरील त्यांच्या उत्कटतेचे स्मरण करून येशूच्या कॅलव्हरीकडे अंतिम प्रवासाचे प्रतीक ठरेलल्या क्रॉसच्या मार्गाची फेरी काढली. पॅरिशचे धर्मगुरू फादर शिजो कुथूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या फेरीत चर्चचे विश्वस्त अॅड. के. एम. रॉय आणि बाबू जोसेफ यांच्यासह ४०० हून अधिक भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. चालत जाताना मंडळी क्रॉसच्या प्रत्येक स्थानकावर थांबली, ख्रिस्ताच्या दुःखाचे आणि प्रेमाचे स्मरण करण्यासाठी प्रार्थना आणि भजन सादर केले. विश्वासणारे क्रॉस आणि ताडाची पाने घेऊन त्यांचा अढळ विश्वास आणि एकता व्यक्त करत असल्याने वातावरण श्रद्धेने भरले होते.
सेंट फ्रान्सिस झेवियर
चिंचवड येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये सकाळी ‘वधस्तभांची वाट’ यावर इंग्रजी, मराठी आणि तमिळ भाषिकांची प्रार्थना झाली. मुख्य फादर साल्वोदर पिंटो यांनी ‘मिस्सा’ दिला. काळेवाडीतील केडीसी चर्चचे रेव्हरंड मकासरे, पिंपरी गावातील हिंदुस्थानी कॉव्हेनंट चर्चमध्ये पास्टर आशिष शेंडगे, दि ऍफ्लीकेटेड कन्सोलर अवरलेडी चर्च फादर अशोक गोन्सालवीस उपासना केली. रावेतमधील ग्लोरिअस आऊटरिच मिनिस्ट्रीज चर्चमध्ये ‘गुड फ्रायडे’निमित्त प्रार्थना केली. निगडीतील मेथडिस्ट मराठी चर्चमध्ये भाविकांना सात वाक्यांचे महत्त्व सांगितले.
इन्फन्ट जिजस चर्च
निगडी-कृष्णानगरमधील इन्फन्ट जिजस चर्चमध्ये ‘प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील अखेरचा प्रवास’ नाट्यरुपाने सादर करण्यात आला. चर्चच्या युवकांनी ‘प्रभू येशू ख्रिस्ताचे दु:खसहन’ यावर धार्मिक नाटिका सादर केली. चर्चमध्ये फादर पीटर रॉड्रिक्स, फादर जॉकिम यांनी इंग्रजी आणि मराठी भाषिकांना प्रवचन दिले. पिंपळे गुरव-दापोडीमधील सेंट थॉमस कॅथलिक चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त ‘प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील अखेरचा प्रवास’ चर्चच्या तरुणांनी धार्मिक नाटिका सादर केली.
PNE25V07460
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.