

पिंपरी, ता. ४ ः महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा प्रभावी वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम व नागरिक केंद्रित बनविण्यावर भर दिला आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. ‘एआय’ हे संकट नसून स्मार्ट सहकारी असेल. या माध्यमातून महापालिका डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारच्या १०० दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुयोग्य माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर’ या विषयावरील प्रशिक्षण वर्गात आयुक्त शेखर सिंह बोलत होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक समीर पांडे आणि पुणे व उत्तर महाराष्ट्र विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात प्रशिक्षण झाले. त्याद्वारे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ChatGPT, Bhashini, Digilocker APIs आणि इतर ई-गव्हर्नन्स टूल्सचे प्रशिक्षण दिले.
‘एआय’बद्दल महापालिका प्रथम
राज्यातील प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणण्यासाठी राज्यभरातील महापालिकांचे आणि अन्य क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने १०० दिवसाचा उपक्रम हाती घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंतर्गत डिजिटल प्रशासन आणि पारदर्शकता, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता सुधारणा, जनता तक्रार निवारण प्रणालीत सुधारणा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सुधारणा, स्मार्ट शहर सुरक्षा आणि सार्वजनिक जागा सुधारणे, तंत्रज्ञानाधारित सुधारणा आणि महसूल वाढ या सर्व कामांच्या सुधारणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्याबद्दल महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले...
- ‘एआय’ तंत्रज्ञान प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा आवश्यक भाग बनत असून, भविष्यातील बळ आहे.
- ‘एआय’मुळे कार्यालयीन कामकाज अधिक जलद, सुलभ आणि अचूक होणार आहे
- प्रत्येकाने तंत्रज्ञानस्नेही होणे काळाची गरज आहे
- भविष्यातील पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी उपयोगी ठरेल
- ‘एआय’च्या योग्य वापराने कामाची गुणवत्ता आणि परिणामकारकता निश्चितच वाढवू शकतो
- तंत्रज्ञानाबद्दलचे गैरसमज दूर करून अचूक समज घेतल्यास आपल्याला ते अधिक सक्षम बनवू शकते.
दृष्टिक्षेपात कृत्रिम बुद्धिमत्ता
- ‘एआय’ म्हणजे काय? ः ‘एआय’ची कार्यप्रणाली, नॅरो व जनरल प्रकार आणि सरकारी कामकाजातील त्याचा वापर
- प्रशासनात महत्त्व ः कार्यक्षमता वाढवणे, मानवी चुका कमी करणे, नागरिकांच्या अपेक्षांनुसार सेवा पुरवणे
- डेटावर आधारित निर्णय प्रक्रिया ः ओपन सरकारी डेटा, विश्लेषण आणि त्याचा धोरणनिर्मितीवर होणारा परिणाम
- एआय आणि ChatGPT चा वापर ः शासकीय पत्रव्यवहार, अहवाल लेखन, योजना प्रस्तावना, नागरिक तक्रार निवारण
- डिजिटल गव्हर्नन्स ः ई-गव्हर्नन्सचा प्रभाव, डिजिटल लीडरशिप आणि स्मार्ट सिटीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका
- ‘एआय’चे धोके आणि जबाबदाऱ्या ः गुप्तता, नैतिकता, चुकीची माहिती आणि नियमन
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.