

काळेवाडीची कोंडी : भाग ३
अमोल शित्रे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ : काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिस्ट सिस्टिम) मार्गावर दररोज होणारी वाहतूक कोंडी शहराच्या दृष्टीने सार्वजनिक समस्या बनली आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला एकत्र जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याला कोंडीतून कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी पायाभूत उपाययोजना करण्याची गरज आहे. आवश्यक त्या चौकात समतल विलगक (ग्रेड सेपरेटर), भुयारी मार्ग (अंडरपास) आणि उड्डाणपूल बांधून गतिमान वाहतुकीसाठी पर्यायी उपाययोजना अमलात आणल्यास कोंडी फोडण्यात यश मिळेल, असे निरीक्षण ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहराच्या पूर्व भागात भोसरी एमआयडीसी आणि पश्चिम भागात हिंजवडी आयटी पार्क वसले आहे. या दोन्ही औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग विकासात भर घालणारा ठरत आहे. हा रस्ता भोसरी औद्योगिक वसाहतीतून निगडी-इंद्रायणीनगर, निगडी-लांडेवाडी-भोसरी, पुणे-मुंबई महामार्ग, काळेवाडी-चिंचवड, काळेवाडी-थेरगाव, औंध-रावेत, औंध-वाकड आणि बंगळुरू-मुंबई महामार्ग ओलांडून हिंजवडी आयटी क्षेत्रात जातो. यातील कोणत्याही मार्गाने आलेल्या नागरिकांना हिंजवडी आणि भोसरी येथे जाण्यासाठी काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्ग वापरावा लागतो.तेथे ठिकठिकाणी होणारी कोंडी फोडण्यासाठी काळेवाडी फाटा ते संत मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट) उड्डाणपुलादरम्यान पायाभूत उपाययोजना करावी लागणार आहे. अन्यथा भविष्यात याहून भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे, असे ‘सकाळ’च्या पाहणीत निदर्शनास आले आहे.
भविष्यात डोकेदुखी वाढणार
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटी मार्गावर भोसरी एमआयडीसी भागात कोंडी होत नाही. या भागात निगडी-इंद्रायणीनगर स्पाइन रस्ता, निगडी-लांडेवाडी-भोसरी प्रशस्त रस्ते आहेत. परंतु, चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपूल ते काळेवाडी फाटा आणि पुढे वाकड उड्डाणपुलापर्यंत सर्वच चौकांत कोंडी होते. विजयनगर, पवारनगर आणि आदर्शनगर चौकात भविष्यात कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या तीनही चौकात भुयारी मार्ग (अंडरपास) करावेत. येथे सेवा रस्त्याने येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग करुन दिल्यास संभाव्य कोंडी टाळता येऊ शकते.
संभाव्य अडथळ्यांवर उपाययोजना करावी
काळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तेरेसा उड्डाणपूल, चिंचवड-केशवनगर, काळेवाडी-पाचपीर चौक आणि काळेवाडी फाटा-तापकीर चौक या चार मार्गांवरील वाहतूक एकत्र येते. चौकाला कोंडीतून मुक्त करण्यासाठी भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. सिग्नल फ्री चौक केल्यास कोंडी फुटू शकते. तापकीर चौकात देखील भुयारी मार्ग आवश्यक आहे. थेरगाव येथून येणारी वाहतूक पुढे मार्गस्थ होताना काळेवाडी फाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून येणाऱ्या वाहनांना तापकीर चौकात थांबावे लागते. तापकीर चौकात भुयारी मार्ग बांधून सिग्नलविरहित वाहतूक सुरू केल्यास कोंडी होणार नाही. परिणामी, वाहनचालकांना वेगात पुढे जाता येईल. काळेवाडी फाटा, तापकीर चौक आणि रहाटणी गावठाण या तिन्ही मार्गांवरील वाहतूक रहाटणी चौकात एकत्र येते. त्यामुळे लाल सिग्नल सुरू होताच वाहनांच्या रांगा लागतात.
- धनगरबाबा मंदिर चौक परिसरात व्यापारी, ग्राहाकांना शिस्त लावणे गरजेचे
- मद्यविक्री, बॅंका, हॉटेल्स, शॉपिंग सेंटरने स्वतःचे वाहनतळ तयार करावे.
- मुख्य रस्त्यावर वाहने लावली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- रहाटणी फाटा चौकात भुयारी मार्ग केल्यास दोन्ही बाजूंची बाजारपेठ सुरक्षित राहून वेगात जाणाऱ्यांना अडथळाविरहीत प्रवास शक्य होईल.
काळेवाडी फाटा येथे समतल विलगक गरजेचा
वाकड आणि रहाटणी फाटा या दोन मार्गांवरुन येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने काळेवाडी फाटा येथे सकाळी आणि सायंकाळी कोंडी होते. सिग्नल सुरू झाल्यानंतर अलिकडे रहाटणी फाटा चौकापर्यंत आणि पलीकडे वाकड येथील छत्रपती चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. कामावर जाणाऱ्यांना उशीर होणे, कोंडीत अडकून राहणे अशा समस्यांचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक सुरळीत करण्यासाठी काळेवाडी फाटा उड्डाणपुलाखाली समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) तयार करावा लागणार आहे.
----------
लक्षात घेण्यासारख्या बाबी
- संत मदर तेरेसा उड्डाणपूल तयार करताना नागरिकांचा विचार केला नाही.
- नागरिकांनी विरोध केल्यानंतर एम्पायर इस्टेट येथे दोन्ही मार्गावर रॅम्प केले.
- पुन्हा विरोध वाढल्यामुळे चिंचवड लिंक रस्त्यावर लूप तयार केले.
- नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर नॉइज कंट्रोल पाटे बसविले.
- पुनरावृत्ती टाळण्यासाठी योजना आखण्याची गरज आहे.
- खासगी प्रवासी वाहतूक बसथांब्याचे स्थलांतर करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.