अल्लाहच्या नामस्मरणात बकरी ईद उत्साहात ईदगाह मैदान गर्दीने फुलले ः सामूहिक नमाज पठण
पिंपरी, ता. ७ : अत्तराचा सुगंध आणि अल्लाहचे नामस्मरण अशा वातावरणात शहरातील मशिदी आणि ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज पठण करून, मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली. सकाळीच ईदगाह मैदान परिसर गर्दीने फुलून गेले होते. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये कुर्बानी, दावत आणि सेवेचा पर्व पाहायला मिळाला. सामूहिक नमाजामध्ये सामाजिक सलोखा, अल्लाहप्रती निष्ठा, त्याग, समर्पण व मानवतेचा संदेश मौलवींनी दिला. आलिंगन देऊन मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. मोठा पोलिस बंदोबस्त होता. नागरिक व वाहन चालकांच्या सोयीसाठी पोलिसांनी शहरातील वाहतुकीत बदल केला होता. बंधुभाव व शांतता नांदावी, यासाठी विशेष दुवा करत बकरी ईदची नमाज अदा केली.
पिंपरी चिंचवड शहरात भोसरी, पिंपरी, आकुर्डी, चिंचवड, वाकड, पिंपळे गुरव, काळेवाडी, सांगवी, तळवडे, निगडी, ओटा स्कीम, रुपीनगर, वाल्हेकर वाडी, नेहरूनगर, खराळवाडी, कासारवाडी, घरकुल, मोशी आदी भागातील मशीद व मद्रासी ईदगाह मैदानावर बकरी ईद आज सकाळी सात ते साडेनऊच्या दरम्यान तेथील मौलाना करवी नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. लहान मुला- मुलींनी तसेच मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून सुवासिक तेल व अत्तर लावून बकरी ईद निमित्त सामुदायिक नमाज अदा केली.
ईदगाह मैदानावर पोलिस आयुक्तांची भेट
चिंचवड गाव येथील ईदगाह मैदानावर सकाळी साडेसात ते साडेनऊ दरम्यान नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सामुदायिक नमाज पठण केले. पिंपरी चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस उपायुक्त सपना गोरे आदींनी यावेळी या परिसरात भेट दिली. ईदगाह मैदान येथे मौलाना इनामूल हक, मौलाना मीनहाज शेख यांनी मुस्लिम बांधवांना सामुदायिक नमाज पढविला. यावेळी सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश बांगर यांचा सत्कार युसूफ बऱ्हाणपुरे, इम्तियाज पानसरे ,इम्तियाज शेख यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष इम्रान पानसरे, मतीन पानसरे, आसिफ शेख, हाजी अत्तार जी. ए. आदींनी केले. यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, इक्बाल काझी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
जामिया गौशिया ट्रस्ट
चिंचवड स्टेशन येथील जामिया गौशिया ट्रस्टच्या मशिदीत सकाळी साडेसात ते नऊच्या दरम्यान नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. नमाज पठनानंतर ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची मुस्लिम बांधवांनी भेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी निहाल पानसरे, ईशान सय्यद, माजी नगरसेवक अस्लम शेख, सादिक पठाण, अक्रम पानसरे आदींनी संयोजन केले. मदरसा ए जामिया ट्रस्ट - वाल्हेकर वाडी, हुसेनी अरबी मदरसा चिंचवडेनगर, नूर ए इलाही जमात आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, वाल्हेकर वाडी, चिंचवड अंजुमन तालीम कुराण दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड सर्व धर्मीय स्मशानभूमी लिंक रोड पत्रा शेड, नूर ए इलाही आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ वाल्हेकरवाडी, हुसेन अरबी मदरसा, चिंचवडेनगर, मदरसा ए जामिया ट्रस्ट शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी आदी ठिकाणी नमाज पठण केले.
कुर्बानीचा प्रसाद
नमाजस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. बकरी ईदनिमित्त महापालिकेने नियुक्त केलेल्या ठिकाणी जनावरांची कुर्बानीही देण्यात आली.
बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी गोरगरीब तसेच नातेवाईक, मित्रांच्या घरी जाऊन कुर्बानीचा प्रसाद दिला. महिला व मुलींनी घरोघरी ईदची नमाज अदा केली. शहरात विविध ठिकाणी आजी-माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या नमाजीनंतर शुभेच्छा दिल्या.
फोटोः 20867
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.