सकाळ संवाद
वाढत्या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त
पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर या ६० फूट रस्त्यालगतच्या परिसरात कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून तो वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कचरा उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसून येते. परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने नियमित कचरा उचलण्यासाठी नियोजन करून ही समस्या तातडीने सोडवावी.
-नितीन सोनवणे, पिंपळे गुरव
03293
दंडात्मक फलकाखालीच कचऱ्याचा ढीग
पिंपळे निलख येथील न्यू डी. पी. रस्त्यावर साठे पेट्रोल पंपाच्या पुढील भागात प्लॅस्टिकसह जैविक व अजैविक कचरा टाकला जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेने कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा देणारा फलक लावलेला असतानाही त्याच फलकाखाली कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- स्वाती शहा, पिंपळे निलख
03298
यशवंतनगर चौकातील धोकादायक स्थिती
यशवंतनगर चौकातील टेल्को रस्त्यावर एक अपंग व्यक्ती दररोज रस्त्यावर भिक्षा मागताना दिसते. चौकात मोठ्या वाहनांची सतत ये-जा होत असल्याने ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. विशेषतः मोठ्या वाहनचालकांना ती व्यक्ती सहज दिसेलच असे नाही, त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, तसेच त्या व्यक्तीस सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावा.
- दीपक पाटील, यशवंतनगर
PNE26W03299
तुटलेल्या चेंबरमुळे अपघाताचा धोका
प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह शेजारील प्रेम सागर अपार्टमेंटजवळील पदपथावर असलेले चेंबर तुटलेल्या अवस्थेत असून ते नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिसरात रात्री पुरेशी प्रकाशयोजना नसल्यामुळे पादचाऱ्यांना हे तुटलेले चेंबर लक्षात येणे कठीण जाते. परिणामी, एखादी व्यक्ती चुकून त्या ठिकाणावरून गेल्यास पडून गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या धोकादायक चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी.
- सलीम सय्यद, चिंचवड
03292
केबल दुरुस्तीनंतर रस्ता न भरलेलाच
एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या गेटसमोर काही दिवसांपूर्वी महावितरणतर्फे केबल दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाने रस्त्यावरचे पेव्हर ब्लॉक तसेच सोडून दिले असून, खोदलेला भाग योग्य प्रकारे बुजविण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या त्या ठिकाणी खड्डा पडला असून पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. विद्युत विभाग आणि महानगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने या ठिकाणाची दुरुस्ती करावी.
- दीपाली कुलकर्णी, श्रीधरनगर, चिंचवड
03297
केबल कामानंतर मातीचा ढिगारा तसाच
रावेत येथील ऐश्वर्यम मेलडी हौसिंग सोसायटीजवळ, स्टेट बँकेसमोर महावितरणकडून काही दिवसांपूर्वी केबल दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. या कामानंतर खड्डा बुजवण्यात आला असला तरी त्या ठिकाणी टाकलेला मातीचा ढिगारा मागील आठ ते दहा दिवसांपासून उचलण्यात आलेला नाही. रस्त्यावरच हा मातीचा ढिगारा पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन रस्त्यावरचा मातीचा ढिगारा लवकरात लवकर हटवावा.
-अर्जुन बन्ने , रावेत
03295
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

