

पिंपरी, ता. १७ ः निगडी ते तळेगाव आणि वडगाव मावळ मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेस धावत आहेत. मात्र, या मार्गावर अनेक ठिकाणी बसशेड किंवा बस थांब्याची पाटीच नसल्यामुळे प्रवाशांना बस थांबा कुठे आहे हेच कळत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश मार्गांवर हीच परिस्थिती आहे. परिणामी, प्रवाशांना एकतर पायपीट करावी लागते किंवा रिक्षा आणि खासगी वाहनांचा वापर करावा लागतो.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील विविध मार्गांवर पीएमपीएमएल मार्फत बससेवा दिली जात आहे. लोणावळा, वडगाव मावळ आणि तळेगावला जाणाऱ्या प्रवाशांसाठी निगडी येथून बससेवा सुरू करण्यात आली आहे. निगडी पवळे चौक ते वडगाव मावळ (३०५), निगडी ते लोणावळा मार्गे कामशेत (३६८), निगडी ते टाकवी (३७१) आणि निगडी ते ऊर्से (३४१), कात्रज ते वडगाव मावळ (२२८) या मार्गांवर बस उपलब्ध असून, दररोज ४२ ते ४५ फेऱ्या होतात. यामधून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. प्रशासनालादेखील लाखो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, या मार्गावरील पीएमपीएमएल बसथांब्यांची अनावस्था झाली आहे. कित्येक ठिकाणी बसशेड नाहीत. नवख्या माणसाला तर बसथांबा कुठे आहे हे कळतच नाही. बरीच चौकशी केल्यावर समजते की बस थांबा कुठे आहे. थांब्याची पाटी नसल्यामुळे बस नंबर किंवा बसचा मार्गही समजत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांच्या अडचणी समजून घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
‘‘बस शेड तर दूर बस थांब्याच्या पाट्यादेखील लावण्यात आलेल्या नाहीत. रस्त्याच्या कडेला १०-१२ लोक एकत्र जमलेले दिसले की समजायचं इथे बसथांबा आहे. बऱ्याचवेळा कंडक्टरने बस कुठे जाणार हे सांगितल्यावर समजते तोपर्यंत अपंग, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना बसची काही माहिती समजत नाही व त्यांना बस पकडता येत नाही.
- प्रकाश दातार, तळेगाव दाभाडे
‘‘प्रवाशांच्या सोयीसाठी शक्य तितके बसशेड उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. महापालिका, स्थानिक नगरसेवक किंवा आमदार निधीतून बसशेड बसवून देण्याची मागणी करत आहोत. तसेच पीएमपीएमएलचे स्वतः बीओटी तत्त्वावर काही ठिकाणी बसशेड बसवत आहे.
- राजेश जाधव, विभागीय व्यवस्थापक, पीएमपीएमएल
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.