पार्किंगला शिस्त लावण्यासाठी सर्वसमावेशक धोरण मंजूर

पार्किंगला शिस्त लावण्यासाठी सर्वसमावेशक धोरण मंजूर
Published on

पिंपरी, ता. १२ : वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंगमुळे शहरातील रस्त्यांवर निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने सर्वसमावेशक पार्किंग धोरण आखले आहे. रस्त्यालगत तसेच रस्त्याबाहेरील पार्किंगचे नियोजन, तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन, टेलिस्कोपिक पार्किंग शुल्क प्रणाली, दैनंदिन व मासिक पार्किंग पास आणि निवासी पार्किंग परवान्यांची तरतूद असलेल्या या धोरणाला स्थायी समितीच्या सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली.

शहरातील उपलब्ध पार्किंग जागांचा अधिक कार्यक्षम वापर करण्याबरोबरच रस्त्यांवर वाहने दीर्घकाळ उभी करण्यास प्रतिबंध करणे, अनधिकृत पार्किंगला आळा घालणे आणि पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावणे, हा धोरणाचा मुख्य उद्देश आहे. पार्किंग व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने वाहनचालकांना उपलब्ध जागांची माहिती मिळण्यासह पार्किंगचे नियोजन अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. पार्किंगसाठी दैनंदिन आणि मासिक पासची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच निवासी भागातील नागरिकांसाठी स्वतंत्र पार्किंग परवान्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहन किती काळ पार्किंगमध्ये ठेवले आहे, त्यानुसार शुल्क आकारण्याची टेलिस्कोपिक शुल्क प्रणालीही लागू केली जाणार आहे.
दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, विकास आराखडा, क्रीडा आणि प्रशासकीय सुधारणांशी संबंधित विविध प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.


महापालिका रुग्णालयांसाठी औषधे, उपभोग्य वस्तू व ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स उपलब्ध करून देणे, वायसीएम रुग्णालयातील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्राची देखभाल, डिजिटल रेडिओग्राफी प्रणालीची उपकरणे तसेच जिजामाता रुग्णालयातील एक्स-रे मशीनच्या दुरुस्तीला मान्यता देण्यात आली.

सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या दैनंदिन स्वच्छता, यांत्रिक स्वच्छता व देखभालीच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली. निगडीतील काही शौचालयांची स्वच्छता महिला बचत गटांमार्फत सुरू ठेवण्यासही मंजुरी मिळाली. प्रभाग ११ मधील नवीन जलवाहिन्या, किवळेतील रस्ते सुधारणा, प्रभाग २५ मधील रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था तसेच पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्त्याच्या विकासकामाला मान्यता देण्यात आली. सुधारित विकास आराखड्यातील आरक्षित जागांसाठी विविध विभागांच्या ना हरकत प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘एसओपी’ लागू करण्यासही मंजुरी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com