

‘लघुउद्योगांचे अवघड दुखणे’ लेखमाला दिशादर्शक
‘सकाळ’मधील ‘लघुउद्योगांचे अवघड दुखणे’ ही लेखमाला सर्वांसाठीच दिशादर्शक ठरणारी आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद होण्यामागे पुरेशा भांडवलाचा अभाव, अनुपालनाचा वाढता खर्च, बाजारपेठेतील अनिश्चितता, अनियमित वीज व पाणीपुरवठा तसेच खड्ड्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी अशा अनेक समस्या आहेत. या अडचणींवर योग्य वेळी उपाययोजना झाल्यास उद्योगांना दिलासा मिळू शकतो. लघु व मध्यम उद्योग बाहेर जाण्याचा निर्णय घेत असताना या प्रश्नांकडे शासन, अभ्यासक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. लेखमालेत कर्जाची पुनर्रचना, थकबाकी वसुलीची प्रभावी यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण यांसारखे उपायही सुचविण्यात आले आहेत. अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास लघुउद्योजकांवर उद्योग बंद करण्याची वेळ येणार नाही. लघुउद्योगांच्या समस्या मांडतानाच त्यावरील व्यवहार्य उपायही सुचविणाऱ्या या अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक लेखमालेबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन.
- अनिल पोटे, निगडी प्राधिकरण
खड्डे, चिखलामुळे लक्ष्मीनगरातील रस्ता धोकादायक
मोशी लक्ष्मीनगर दक्षिण येथील अनुष्का सोसायटीपासून साई स्नेह सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, पावसामुळे चिखल साचल्याने रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. महिलांना दुचाकीवरून लहान मुलांना शाळेत सोडणे व आणणेही जिकिरीचे झाले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता विद्यमान नगरसेवकांच्या कार्यालयासमोरून जात असूनही त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच रस्त्यावर भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करून भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा.
- अजिंक्य जोशी, मोशी लक्ष्मीनगर
चापेकर चौकातील मागण्यांकडे लक्ष द्यावे
चिंचवडगावातील चापेकर चौकात वाहतूक नियंत्रण दिवे आणि भुयारी मार्ग उभारण्याची चिंचवड ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, अद्याप या दोन्ही मागण्यांपैकी एकही पूर्ण झालेली नाही. वाहतूक नियंत्रण दिवे तांत्रिक अडचणींमुळे बसविता येत नसल्याचे सांगितले जाते. तसेच भुयारी मार्गाच्या कामासाठी किती जागा व गाळे काढायचे, याबाबत एकमत नाही. नवनिर्वाचित नगरसेवकांनी या दोन्ही प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्यकाळात वाहतूक नियंत्रण दिवे आणि भुयारी मार्ग हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
- रमेश देव, चिंचवड
अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
चिंचवडगावातील चापेकर चौक परिसरातील पदपथावर हातगाड्या आणि पथारी व्यावसायिकांनी ठाण मांडल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच भजी-वडे विक्रेत्यांसमोरच वाहने उभी केली जात असून, चौकात ‘नो पार्किंग’चा फलक असतानाही नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चौकातील रिक्षांची गर्दीही कमी करणे गरजेचे आहे. याशिवाय चौकात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात यावेत. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- रमेश पाटील, चिंचवडगाव
भक्ती-शक्ती चौकातील गतिरोधकांचा त्रास
भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या पुलाखालून आकुर्डी रेल्वे स्थानकाकडे येताना रस्त्यावर असलेल्या गतिरोधकांमुळे दुचाकीस्वारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गतिरोधकांची उंची आणि रचना योग्य नसल्याने दुचाकीस्वारांचा प्रवास त्रासदायक होत आहे. महापालिका प्रशासनाने या गतिरोधकांची पाहणी करून ते काढून टाकावेत किंवा त्यामध्ये आवश्यक बदल करावेत. संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दुचाकीस्वारांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.
- कोळीदास कोकील, निगडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.