गुन्हे वृत्त
ज्येष्ठ नागरिकाला एक कोटींचा गंडा
पिंपरी : सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला अटकेची भीती दाखवत अज्ञात व्यक्तीने एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड येथे घडला.
या प्रकरणी चिंचवड, शिवाजी पार्क येथील ७७ वर्षीय व्यक्तीने पिंपरी चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून आपण सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगितले. एका व्यक्तीवर झालेल्या ईडी कारवाईत फिर्यादी यांचे बँक खाते आढळले असून ते मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरले असल्याचे सांगितले. या कारवाईतून वाचविण्यासाठी फिर्यादीच्या बँक खात्यावरील व म्युच्युअल फंडातील रकमेची खात्याची लिगॅलिटी चेक करावयाची असल्याचे सांगून त्यांना अटकेची भीती घातली. त्यांना धमकावून विविध बँक खात्यांत एक कोटी रुपये पाठवण्यास भाग पाडले.
मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती चव्हाण रुग्णालयासमोर (वायसीएम) घडली.
या प्रकरणी शंकर उर्फ गट्टया संभाजी चौधरी (रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहन विजय सूर्यवंशी (रा. कासारवाडी), वैभव विजय चाबुकस्वार (रा. संत तुकारामनगर, पिंपरी) व शाहबाज खान (रा. वाकड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांचे मित्र विशाल जाधव यांच्यासह वायसीएम रुग्णालयासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा मित्र विशाल यांना कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली.

