पीएमआरडीएची ‘ब्लॉकचेन’ आणि ‘जीआयएस’ प्रणाली सुरू
पिंपरी, ता. २१ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरी सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी २९ सेवा पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरी नियोजन अधिक अचूक व प्रभावी करण्यासाठी ‘जीआयएस पोर्टल’ सुरू करण्यात आले असून, उपग्रह प्रतिमा व प्रगत जीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास आराखडा, पूररेषा, जागांची सद्यस्थिती तसेच विविध विभागांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान व शास्त्रीय झाली आहे. ब्लॉकचेन प्रणालीमुळे माहिती सुरक्षित, अपरिवर्तनीय ठेवली जात असून, पारदर्शकता वाढली आहे आणि माहितीची पडताळणी सुलभ झाली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
पीएमआरडीएने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन लोकाभिमुख सेवा देणारे बनवले आहे. या उपक्रमांमुळे नागरिकांच्या अनावश्यक कार्यालयीन फेऱ्यांना आळा बसला आहे. पीएमआरडीएने टीडीआर नोंदी सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली बनावट कागदपत्रे व फसवणूक रोखण्यास मदत करते. सर्व नोंदी सुरक्षित स्वरूपात उपलब्ध आहेत. ‘ॲमेनिटी प्लॉट्स’च्या निर्मिती, विक्री व विकास प्रक्रियेत ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना जमिनीच्या वास्तविक मालकीचा तपशील, सार्वजनिक सुविधांचा अंतिम विकास तसेच लिलाव करण्यात आलेल्या जमिनीशी संबंधित संपूर्ण माहिती उपलब्ध होते. ‘आरटीआय’ शिवायही माहिती पडताळता येत असल्याने प्रशासनावरील विश्वास वाढला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
महानगराचे नियोजन अधिक अचूक व परिणामकारक करण्यासाठी जीआयएस पोर्टल विकसित करण्यात आले आहे. हे पोर्टल प्रगत जीआयएस तंत्रज्ञान व उपग्रह प्रतिमांवर आधारित असून, विविध विभागांची माहिती एकत्रित करते. नागरिकांना जमीन, सार्वजनिक सुविधा, नैसर्गिक आपत्तींचे धोके आणि विकास प्रकल्पांबाबत माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

