‘चिंचवड’, ‘भोसरी’ला पुन्हा की 
‘पिंपरी’ला महापौरपदाची संधी?

‘चिंचवड’, ‘भोसरी’ला पुन्हा की ‘पिंपरी’ला महापौरपदाची संधी?

Published on

पिंपरी, ता. २२ ः पिंपरी चिंचवडचे महापौरपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे चुरस वाढली असून, महापौरपदी कोण विराजमान होणार? गेल्या वेळेप्रमाणे भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी अडीच-अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कारभारी वाटून घेणार? की पिंपरी विधानसभा मतदारासंघातील नगरसेवकांना संधी देणार? खुला प्रवर्गातून विजयी झालेल्यांनाच संधी मिळणार की सर्वांमधून एकाची निवड करणार? पहिले अडीच वर्ष दोघांमध्ये विभागून देणार की तिथेही एकालाच संधी देणार? याकडे लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भाजपने एकहाती जिंकली. त्यांना १२८ पैकी ८४ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. शिवाय, एक पुरस्कृत अपक्ष उमेदवारही विजयी झाला आहे. त्यामुळे कोणत्या संवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण निघणार? याचीच चर्चा होती. तिला गुरुवारी आरक्षण सोडत मुंबईत काढल्यानंतर पूर्ण विराम मिळाला आहे. मात्र, आता महापौर कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. कारण, पिंपरी चिंचवडचे महापौरपद सर्वसाधरण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी ः इतर मागासवर्गीय) यांसाठी अनुक्रमे २०, ३ व ३४ जागा आरक्षित केल्यानंतर सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी ७१ जागा उरल्या होत्या. त्यात ५० टक्के आरक्षणाप्रमाणे ३५ जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्या होत्या. आता महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे चुरस वाढली असून, महापौर कोण? याचे आराखडे बांधले जात आहेत. विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसही महापौरपदाच्या निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविणार, यात शंका नाही. मात्र, भाजपचे संख्याबळ बघता राष्ट्रवादीचे केवळ दबावतंत्र ठरणार आहे.

भाजपचे संख्या बळ
सर्वसाधारण प्रवर्ग जागेवरील भाजपचे ४३ जण निवडून आले आहेत. त्यात २२ महिलांचा समावेश आहे. मात्र, महापौरपद खुले राहिल्याने एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठीच्या आरक्षित जागांवर निवडून आलेलेही महापौरपदावर दावा करू शकतात. त्यामुळे भाजपचे ८४ नगरसदस्य महापौरपदासाठी पात्र ठरतात. यामध्ये ओबीसीतील २४, एससीतील १५ व एसटीतील दोघांचा समावेश आहे.

गेल्या वेळची स्थिती
ओबीसी आरक्षणामुळे भाजपने २०१७ मध्ये राहुल जाधव व नितीन काळजे यांना संधी देऊन पहिली अडीच वर्ष दोघांत वाटून दिली होती. नंतर महिला खुला प्रवर्गातून उषा ढोरे यांना संधी दिली. जाधव व काळजे भोसरी विधानसभा मतदारासंघातील अनुक्रमे चिखली जाधववाडी व चऱ्होलीतील होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवीच्या ढोरे होत्या. कोविड काळामुळे सव्वा-सव्वा वर्ष विभागणी करणे शक्य न झाल्याने सुमारे अडीच वर्ष त्याच महापौर होत्या.

आता ‘पिंपरी’ला संधी?
भाजपच्या सत्ताकाळात अर्थात २०१७ ते २०२२ मध्ये भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सदस्यांना महापौरपदाची संधी दिली होती. आता पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून निवडून आलेल्या नगरसदस्याला संधी मिळेल का? की पुन्हा भोसरी किंवा चिंचवडकडे महापौरपद जाते? हे बघणेही औत्सुकतेचे होणार आहे.

आता पुढे काय?
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानुसार महापालिकेची विशेष सभा होऊन त्यामध्ये निवड प्रक्रिया सुरू होईल.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com