मोशीतील स्मशानभूमी मरणासन्न अवस्थेत
पिंपरी, ता. २४ ः मोशी येथील स्मशानभूमीत तीव्र पाणीटंचाई भासत आहे. अंत्यविधीपूर्वी अंघोळीसाठीही पाणी नसते. स्वच्छतागृहांमध्येही पाणी नाही. त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमीची अवस्था मरणासन्न झाली आहे.
अंत्यविधीसाठी वापरलेले साहित्य, पालापाचोळा, कपड्यांची गाठोडी पडून आहेत. महापालिकेचे विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने ही अवस्था आली आहे. या स्मशानभूमीत दररोज वीसपेक्षा जास्त अंत्यविधी होतात. महापालिकेच्या गायकवाड वस्ती, खानदेशनगर, गंधर्व कॉलनी, कुदळे वस्ती, मोशी गावठाण, सस्ते वाडी, बोऱ्हाडे वाडी, शिवाजी वाडी या भागातील अनेक नागरिकांना ही स्मशानभूमी सोईची आहे. लाकडांची चिता रचून अंत्यविधी करण्यासाठी एक शेड आहेत. स्मशानभूमीतील नळांना पाणी येत नाही, तसेच साठवण टाक्याही कोरड्या आहेत.
कचरा कोणीही उचलत नाही
मोकळ्या जागांमध्ये पडणारे बांबू, कपडे, मडके यासह अंत्यविधीसाठी लागणारा अन्य प्रकारचा कचरा कोणीही उचलत नाही. त्यात पालपाचोळाही मोठ्या प्रमाणात पडून असतो. त्यामुळे घाण पसरली आहे. शेडमध्ये अंत्यविधीनंतर बांबू, मडके अन्य साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, पण हा कचरा मागील बाजूला फेकला जातो. तो अनेक महिने उचलला गेला नसल्याने प्रचंड घाण झाली आहे. पाण्याअभावी स्वच्छतागृह बंद आहे.
‘स्मार्ट सिटी’तही पाणीटंचाई
अंत्यसंस्कारासारख्या प्रसंगी या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. एकीकडे आपण शहराला ''स्मार्ट सिटी'' म्हणतो, मात्र, स्मशानभूमीसारख्या ठिकाणी किमान पाण्याची सोय नसावी, ही बाब नागरिकांसाठी क्लेशदायक आहे.
---
अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना हात-पाय धुण्यासाठी पाणी नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महापालिकेने किमान पिण्याची आणि स्वच्छतेसाठी पाण्याची सोय २४ तास उपलब्ध करून द्यायला हवी.
- दयानंद पाटील, स्थानिक रहिवासी
---
स्मशानभूमी परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावली जात नाही. प्रशासनाला वारंवार कळवूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोशीसारख्या वेगाने वाढणाऱ्या भागात स्मशानभूमीची ही दुरवस्था मनाला क्लेश देणारी आहे.
- प्रवीण जाधव, स्थानिक रहिवासी
आम्ही कर भरतो, मग आम्हाला मूलभूत सोयी का मिळत नाहीत? केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्षात स्मशानभूमीचा कायापालट व्हावा आणि पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी, हीच आमची मागणी आहे.
- निर्गुण थोरे, स्थानिक रहिवासी
मोशीतील स्मशानभूमीत समस्या सोडविण्यात येतील. नागरिकांना नेमक्या काय-काय समस्या भेडसावत आहे, याची माहिती घेऊन समस्या सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात येतील.
- तानाजी नरळे, सहाय्यक आयुक्त
---
मोशी ः स्मशानभूमीतील स्वच्छतागृहे पाण्याअभावी बंद आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

