पिंपरीचे महापौरपद ‘खुले’; अनेक दिग्गज रांगेत

पिंपरीचे महापौरपद ‘खुले’; अनेक दिग्गज रांगेत

Published on

पिंपरी, ता. २२ : पिंपरी चिंचवडचे महापौरपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निश्‍चित झाले आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. अनेकांनी त्यासाठी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली असून वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र, एकहाती सत्ता मिळवलेला भारतीय जनता पक्ष निष्ठावंतांना संधी देणार, की आयत्यावेळी पक्षात आलेल्यांना पायघड्या घालणार, नवख्यांना संधी देणार की अनुभवी सदस्यांची वर्णी लागणार? त्यातही महिलांना संधी देणार की पुरषांना प्राधान्य देणार? याकडे लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने १२८ पैकी ८४ जागांवर विजय मिळाला आहे. शिवाय, एक पुरस्कृत अपक्षही विजयी झाला आहे. त्यामुळे कोणत्या संवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण निघणार? याचीच चर्चा होती. तिला गुरुवारी आरक्षण सोडतीनंतर पूर्णविराम मिळाला. मात्र, आता महापौर कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. २०१७-२०२२ या कालावधीतील निर्णयाप्रमाणे भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी अडीच-अडीच वर्षे भाजपचे स्थानिक कारभारी वाटून घेणार? की पिंपरी विधानसभा मतदारासंघातील नगरसेवकांना संधी देणार? खुला प्रवर्गातून विजयी झालेल्यांनाच संधी मिळणार की सर्वांमधून एकाची निवड करणार? पहिले अडीच वर्ष दोघांमध्ये विभागून देणार की तिथेही एकालाच संधी देणार? याकडे लक्ष लागले आहे. ३७ जागा मिळवलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही महापौरपदाच्या निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवून दबावतंत्र वापरणार यात शंका नाही. परंतु, भाजपचे संख्याबळ पाहता महापौर भाजपचाच होणार, हे निश्चित आहे. त्यांचे सर्वसाधारण प्रवर्ग (खुल्या) जागेवर ४३ जण निवडून आले आहेत. त्यात २२ महिलांचा समावेश आहे. त्यांच्यासह अन्य सदस्यही महापौरपदावर दावा करू शकतात. आता विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानुसार महापालिकेची विशेष सभा होऊन त्यामध्ये निवड प्रक्रिया सुरू होईल.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com