गुन्हे वृत्त
मद्यासाठी पैसे न दिल्याने
तरुणासह चौघांना मारहाण
पिंपरी : मद्य पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तिघांनी मिळून एक तरुण आणि त्याच्या तीन नातेवाइकांना सिमेंटचा गट्टू तसेच हातापायांनी बेदम मारहाण केली. चिंचवडमधील गोल्डन चौक परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी साबिरअली मुजीबुल रेहमान मनिहार (रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी करण दोढे (रा. विद्यानगर, चिंचवड) याला अटक केली असून चेतन सूर्यकांत पात्रे आणि लक्ष्या कांबळे (दोघेही रा. विद्यानगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी काकांसाठी औषध घेऊन घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून मद्यासाठी पैसे मागितले. नकार देताच लक्ष्याने फिर्यादीच्या कानाखाली मारली आणि सिमेंटचा गट्टू पायावर मारून त्याला जखमी केले. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत फिर्यादीच्या नातेवाइकांनी जाब विचारताच त्यांचे काका आणि चुलत भावांनाही मारहाण करण्यात आली. पुन्हा आल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली.
---------------------
ऑनलाइन जुगार अड्ड्यावर कारवाई
पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडून आणि प्रतिबंधित वेब पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कारवाई केली. मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक सोसायटीमधील एका सदनिकेत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी प्रणय मनोहर जांभुळे, दुर्गेश गणेशराम छेदया, सुनीलकुमार शैलेशभाई चौधरी, सारंग बालाजी डफ आणि मुकेश कुमार कुसेराम या पाच जणांवर गुन्हा दाखल केला. आरोपी ''विन अड्डा'' नावाच्या प्रतिबंधित बेटिंग पोर्टलद्वारे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना जुगार खेळवत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख एक हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. आरोपींनी बनावट कागदपत्रे आणि सिमकार्डचा वापर करून दुसऱ्यांच्या नावे बँक खाती उघडली होती. सिमकार्डद्वारे बँक खातेधारकांची ओळख वापरून आरोपी लॅपटॉप आणि मोबाईलद्वारे त्यांचा पासवर्ड घ्यायचे. एक आरोपी सांगेल त्या बँक खात्यात वेळोवेळी पैसे ट्रान्स्फर करायला लावून सामान्य लोकांना फसविले जायचे.
------------
तडीपार गुंडाला अटक
पिंपरी : दोन वर्षांसाठी तडीपार असूनही शहरात आलेल्या गुंडाला भोसरी पोलिसांनी अटक केली व त्याच्याकडून एक कोयता जप्त केला. भोसरीतील गावजत्रा मैदानाजवळ ही कारवाई करण्यात आली. रमिझ अल्ताफ काझी (रा. दिघी रस्ता, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. रमिझला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्हा हद्दीतून वर्षांसाठी तडीपार केले आहे. तो आदेशाचा भंग करून शहरात फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

