‘अशा स्पर्धा शहरात नेहमीच व्हाव्यात’
पिंपरी, ता. २३ : ‘‘पुणे ग्रॅंड टूरसारख्या स्पर्धा वारंवार पुणे जिल्ह्यात घ्याव्यात. त्यामुळे रस्तेही उत्तम होतील’’ ‘‘या स्पर्धेच्या यशासाठी झटणाऱ्या प्रशासनाचे कौतुक,’’ ‘‘सामान्य नागरिकांसाठी यातील पाच ते दहा टक्के कार्यतत्परता दाखवली, तरी नागरिकांची सोय होईल..’’ अशा एक ना अनेक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.
चार टप्प्यांत आयोजित करण्यात आलेल्या या सायकल स्पर्धेच्या उत्तम आयोजनाचे नागरिक कौतुक करत आहेत. मात्र, ‘‘या स्पर्धेसाठी युद्धपातळीवर रस्ते दुरुस्ती झाली, तशी एरव्ही का केली जात नाही?’’ असाही प्रश्न नेटिझन्सनी विचारला आहे. या आशयाचे मीम्सचा आणि व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन व समारोप असे दोन टप्पे पिंपरी चिंचवडच्या हद्दीत झाले. या निमित्ताने या मार्गावरील रस्त्यांची डागडुजी तर झालीच. मात्र, जिथे सिग्नल यंत्रणा नव्हती तीदेखील कार्यान्वित करण्यात आली. रस्ता दुभाजकांवर नवीन झाडे लावण्यात आली, ठिकठिकाणी सायकल व स्पर्धेशी निगडित प्रतिकृती करून सुशोभीकरण करण्यात आले. तसेच गतिरोधकांची उंचीही कमी करण्यात आली. हे काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा रात्रंदिवस झटत होती. स्पर्धेच्या दिवशीही ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली. नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर होता आणि स्पर्धाही यशस्वीरीत्या पार पडली. याचे कौतुक सर्वत्र होत आहे.
‘‘चार दिवस चाललेली सायकल स्पर्धा उत्तमरित्या झाली. त्याहून मोठे आश्चर्य होते ते अगदी दोन-तीन दिवसांत झालेल्या रस्त्यांच्या सुधारणांचे. जे रस्ते २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतरही सुधारले नव्हते, ते अचानक चकाचक झाले. या पूर्वी असा चमत्कार फक्त राष्ट्रपतींच्या भेटीवेळी आणि जी-२० आयोजनादरम्यान काही मार्गिकांमध्ये झाला होता. असे वाहतूक नियोजन, रस्ते दुरुस्ती, देखभाल, प्रशासनाची तत्परता नेहमी का होऊ शकत नाही? असा प्रश्न सर्वच नागरिकांच्या मनात आहे.
- आदित्य गाडगीळ, आयटी अभियंता
आपल्या भागात ही स्पर्धा झाली, याचा खरंच आनंद आहे. या निमित्ताने का होईना येथील कामे झाली. अगदी रस्ता दुभाजकांवरही सुशोभीकरण करण्यात आले आहे. स्पर्धा उत्तमपणे झाली, यासाठी प्रशासनाचे कौतुक. पण, जे लोक कर भरतात त्यांनाही अशा सुविधा का मिळू नयेत? असा प्रश्न पडतो. अशी रस्तेदुरुस्ती स्पर्धेपुरती होणार असेल तर सायकल स्पर्धा नेहमी व्हाव्यात.
- एक महिला, रावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

