शहर सुरक्षेला मिळणार आणखी बळ

शहर सुरक्षेला मिळणार आणखी बळ

Published on

पिंपरी, ता. २५ : गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी आवश्यक असलेल्या एआय आधारित एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास शासनाच्या उच्चस्तरीय समितीची (एचपीसी) मान्यता मिळाली आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या प्रकल्पाला मान्यता दिल्याने शहराची कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन यास आणखी बळ मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने तंत्रज्ञान आधारित पोलिसिंगवर भर देत हा सीसीटीव्ही प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्याला आता अधिकृत मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प संपूर्ण आयुक्तालयात एकात्मिक व केंद्रीकृत व्यवस्था निर्माण करणार आहे. या प्रकल्पात पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मिशन व पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत बसविण्यात आलेले सध्याचे सीसीटीव्ही कॅमेरे एकत्रित करण्यात येणार असून, महत्त्वाच्या व अद्याप कव्हरेज नसलेल्या भागांमध्ये नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाअंतर्गत चाकण एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी आणि भोसरी एमआयडीसी यांसारख्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांसह हिंजवडी आयटी हबमध्ये या सीसीटीव्ही मार्फत विशेष निगराणी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर देहू व आळंदी या धार्मिक तीर्थक्षेत्रांमध्ये, सण-उत्सव तसेच पालखी सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या गर्दीचे प्रभावी नियोजन व सुव्यस्थित वाहतूक व्यवस्थापन करता यावे, यासाठी सीसीटीव्ही व्यवस्थेचे मजबूत जाळे उभारण्यात येणार आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पोलिस आयुक्तालयात अत्याधुनिक एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यात येणार असून, यामधील थेट दृश्ये सर्व परिमंडळ पोलिस उप-आयुक्त, वाहतूक विभाग व पोलिस ठाण्यांना उपलब्ध राहणार आहेत.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती (पीआयसी) स्थापन केली असून, त्यात पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमआयडीसी आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
---
*हे असेल या प्रकल्पांतर्गत
या प्रकल्पात एआय-आधारित प्रगत व्हिडिओ अ‍ॅनालिटिक्सचा वापर करण्यात येणार असून या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राबविण्यात येणारा हा प्रकल्प गुन्हे शोध, गुन्हे तपास, वाहतूक नियमांची अंमलबजावणी, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी उपयुक्त ठरणार आहे. एकात्मिक व केंद्रीकृत सीसीटीव्ही व्यवस्था, औद्योगिक, आयटी व धार्मिक परिसरावर विशेष लक्ष, वाहतूक, गर्दी आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com