टेल्कोतील मित्रांचे ‘सुवर्ण महोत्सवी’ ऋणानुबंध
पिंपरी, ता. २७ : मैत्री, माणुसकी आणि एकमेकांप्रती कृतज्ञतेचा संगम ठरलेल्या टेल्को प्रशिक्षण विभागामधील मित्रांच्या सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलनाचे आयोजन वरसगाव जलाशय परिसरातील ‘सूर्य शिबिर रिसॉर्ट’ येथे नुकतेच उत्साहात पार पडले. तब्बल पन्नास वर्षांपूर्वी देश-परदेशांत विखुरलेले ‘टेल्को’च्या प्रशिक्षण विभागामधील मित्र या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आणि ‘सुवर्ण महोत्सवी’ ऋणानुबंध पुन्हा उलगडले.
‘टेल्को’मध्ये ‘फुल ट्रेनिंग अप्रेंटिसशिप’च्या १२ बॅचमध्ये एक सप्टेंबर १९७६ ला एसएससी उत्तीर्ण झालेले १५७ किशोरवयीन युवक दाखल झाले होते. ‘टेल्को’तील एफटीए हॉस्टेल हे केवळ निवासस्थान नसून शिस्त, संस्कार, शिक्षण, व्यायाम, योग, क्रीडा, कला आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र होते. या घडणीतून घडलेले अनेक तंत्रज्ञ पुढे टाटा मोटर्समध्ये उच्च पदांवर पोहोचले, काहीजण शासकीय सेवेत, तर काही उद्योजक म्हणून यशस्वी झाले. देश-विदेशांत स्थायिक झालेले अनेक मित्र या स्नेहसंमेलनासाठी खास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी वक्ते, कवी आणि विनोदी साहित्य लेखक डॉ. संजय उपाध्ये यांच्या ‘मन करा रे प्रसन्न’ या व्याख्यानाने उपस्थितांना ऊर्जा दिली. त्यांच्या सत्कारप्रसंगी चित्रकार प्रमोद वाळणकर यांनी काढलेले हुबेहूब रेखाचित्र भेट देण्यात आले. स्मृतिचिन्ह म्हणून प्रत्येक सभासदाला ‘टेल्को’ हॉस्टेल आणि लोगो छापलेला खास टी-शर्ट देण्यात आला.
दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात देश-परदेशातून ७९ मित्र व ३८ सहचारिणी सहभागी झाले. काही मित्र आजारी असूनही व्हीलचेअरवर उपस्थित राहिले, हे ऋणानुबंधांचेच द्योतक होते. या स्नेहसंमेलनाने पन्नास वर्षांची मैत्री अधिक घट्ट करत माणुसकीची खरी संपत्ती अधोरेखित केली. हेमंत गद्रे हे हार्मोनिका (माऊथ ऑर्गन) वादक आहेत. त्यांनी लोकप्रिय गाण्यांचे हार्मोनिकावर उत्तम सादरीकरण केले. प्रकाश हेरेकर, गिरीश भारंबे, विजय परब व सुनील घाटे यांची गाणी गायली आणि वातावरणात रसिकांना एक वेगळाच उत्साह आणि आनंद निर्माण झाला.
ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक सुधीर कट्टी व राजू पाटील, कामगार आयुक्त रमेश सावंत, निप्रो कंपनी अध्यक्ष प्रदीप कुटुंबे, टाटा मोटर्सचे सहाय्यक महाव्यवस्थापक विलास ढोकले, आर्थिक सल्लागार जयंत हरडे, युनियन लीडर विजय परब व कैलास माळी, लेखक चंद्रकांत राणे आणि कवी संजय चव्हाण उपस्थित होते. तर, काही मित्र राजकोट, इंदूर, गोवा, नागपूर, नाशिक येथूनही आले होते. स्नेहसंमेलन संयोजनात अविनाश तलाठी, जयंत टेंबेकर, विलास ढोकले, प्रमोद वालणकर, नारायण खांबे, प्रकाश हेरेकर, सुधीर सहस्रबुद्धे, गिरीश भारंबे, रामचंद्र बागडे, हर्षवर्धन डोंगरे यांचा सहभाग होता. जयंत टेंबेकर यांचे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या संमेलनांच्या यशस्वी अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वाचे योगदान असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

