अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, बाजारपेठा बंद

अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, बाजारपेठा बंद

Published on

पिंपरी, ता. २८ ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पिंपरी चिंचवड शहर परिसरावर बुधवारी (ता.२८) शोककळा पसरली. राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेतून मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि व्यवहार बंद ठेवले.
राज्याच्या राजकारणातील धडाडीचे नेते अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरासह उपनगर भागांतही स्वयंस्फूर्तीने बाजारपेठा बंद करण्यात आल्या. या दुःखद प्रसंगी कोणाच्याही आवाहनाची वाट न पाहता शहरातील सर्व व्यापारी संघटना, छोटे-मोठे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांनी स्वतःहून आपले व्यवहार बंद ठेवले. शहरातील सर्वात मोठी पिंपरी कॅम्प येथील बाजारपेठही बंद होती. पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी भाजी मंडईमध्येही शुकशुकाट पाहायला मिळाला. राज्य शासनाने दुखवटा आणि शासकीय सुटी घोषित केल्यानंतर सकाळी ११ नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले. तर दुपार सत्रातील शाळांना सुटी देण्यात आली. महापालिकेसह शहरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बंद करण्यात आली. नेहमी वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

श्रद्धांजलीचे फ्लेक्स
राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपले राजकीय भेदभाव बाजूला ठेवून शोक व्यक्त केला. अनेक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी वृत्त समजताच बारामतीकडे धाव घेतली. शहरातील चौकाचौकांत ‘निःशब्द’, ‘विकास पुरुष हरपला’, ‘पिंपरी चिंचवडचा शिल्पकार हरपला’, ‘दादांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा विविध आशयाचे फ्लेक्स पाहायला मिळाले.

नागरिकांना अश्रू अनावर
चिखली : चिखली परिसरावर शोककळा पसरली असून श्रद्धांजली वाहताना आणि अजित पवार यांच्या आठवणी सांगताना अनेक नागरिकांना अश्रू अनावर झाले. चिखली, तळवडे, कृष्णानगर परिसरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. चिखली रस्ता, तळवडे व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवली. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी साने चौक येथे जमून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी एक घरातील माणूस गेल्याची भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणी सांगताना अनेकांचा कंठ दाटून आला.

देहूमध्येही दैनंदिन व्यवहार बंद
देहू : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीर्थक्षेत्र देहू विकास आराखड्याच्या माध्यमातून दोनशे चार कोटी रुपयांचा विकास आराखडा जाहीर केला. २००६ पासून ते २०१५ पर्यंत विकास आराखड्यातील विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे, देहू हे राज्यातील एक स्वच्छ आणि सुंदर तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे. याचे सारे श्रेय पवार यांना जाते. देहूतील ग्रामस्थ हे विसरले नाहीत. त्यामुळे पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच देहूत शोककळा पसरली. अनेक युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाले. तर संपूर्ण दिवस देहूतील व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली. देहूत पवार यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. याचे फलित म्हणून साडेतीन वर्षांपूर्वी देहूतील नगरपंचायत निवडणुकीत देहूतील मतदारांनी एकहाती राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी केले. विकास आराखड्यात गावातील रस्ते रूंदीकरण झाले. इंद्रायणी घाट सुशोभीकरण, भूमिगत गटार योजना, नवीन पाणीपुरवठा योजना, वारकऱ्यांसाठी भक्तनिवास, सुलभ स्वच्छतागृह बांधणे, मैला शुद्धीकरण प्रकल्प व इतर कामे पूर्ण झाली.

करारी दादांची आठवण...
देहूतील देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातून संत तुकाराम महाराज मुखवटा चोरीस गेला. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार होते. याच कालावधीत चोरी झाली. त्यामुळे अजित पवार यांनी देहूला भेट देऊन आढावा घेतला. मंदिर सुरक्षा त्रुटी होत्या. याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यावर दादांनी सांगितले की ‘संस्थानला योग्य व्यवस्थापन शक्य होत नसेल, तर सरकारकडून योग्य दखल घेऊ.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com