काळाच्या पटलावरून आजचा दिवस पुसावा
पिंपरी, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूमुळे शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना धक्का बसला आहे. त्यांच्यासारखा जिवंत मनाचा नेता पुन्हा होणे अशक्य आहे. काळाच्या पटलावरून आजचा दिवस पुसावा, अशा आशयाच्या भावनिक प्रतिक्रिया या नेत्यांनी व्यक्त केल्या.
आज माझे सर्वस्व हरपले. संपूर्ण महाराष्ट्राने आज एक दूरदृष्टी असलेल्या लोकनेत्याला गमावले आहे. महाराष्ट्रची मोठी राजकीय हानी झाली आणि आम्ही पोरके झालो.
- अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
---
अजित पवार यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांचा आणि माझा परिचय झाला. १९९५ मध्ये पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मी त्यांना बोलावले होते. त्यानंतर दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे तसेच त्यांनी पाठपुरावा करत मला महापालिकेसाठी उमेदवारी दिली होती. स्थायी समितीच्या निवडी दरम्यान आम्ही विरोधात गेलो तरी संबंध कधीच दुरावले नाहीत. चार दिवसांपूर्वीच आमचे बोलणे झाले होते. त्यामध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर आपण सोबत आल्यास स्वीकृत सदस्यांच्या संख्येबाबत चर्चा झाली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार
---
महाराष्ट्राच्या हितासाठी सुरू असलेली अजित दादांची धावपळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी नेहमीच प्रेरणादायी होती. माझ्या राजकीय, सामाजिक, वैयक्तिक जीवनात दादांनी नेहमीच बळ दिले. कोणतेही संकट, अडचण आली तरी ‘महाराष्ट्राचा दादा माणूस’ आपल्या पाठीशी आहे हा विश्वास कायम असायचा. भोसरी विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार म्हणून मला संधी देत त्यांनी विश्वास दाखवला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांना आधुनिक रूप देत दादांनी दोन्ही शहरांच्या विकासाला गती दिली. भोसरी शहराच्या विकासासाठी त्यांनी मला मोठे पाठबळ दिले. अजित दादा आपल्याला अचानक सोडून गेले. त्यांचे जाणे हे आभाळ कोसळण्यासारखे आहे. आयुष्यात यापुढे आपण काहीही साध्य करू, काहीही कमवू. पण दादांसारखा जिवंत मनाचा नेता पुन्हा साध्य करणे अशक्य असेल.
- विलास लांडे, माजी आमदार
---
पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीचे, प्रगतीचे आणि विकासाच्या वाटचालीचे खरे शिल्पकार अजित दादा होते. आमचे वडीलबंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या सोबत शहरासाठी तब्बल तीस वर्षे काम केले. शहराचा कायापालट करण्यासाठी झपाटून काम करणारी ही दोन व्यक्तिमत्त्वे होती. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी व्यथित करणारी आहे.
- शंकर जगताप, आमदार, चिंचवड
---
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) नव्या इमारतीचे उद्घाटन करताना आम्ही सोबत होतो. त्या कार्यक्रमानंतर अजित दादांनी इमारतीची चिकित्सक पद्धतीने पाहणी केली. काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विकासाचे व्हीजन असलेले नेतृत्व गमावल्याने मन सुन्न झाले आहे.
- उमा खापरे, आमदार, विधान परिषद
---
मुंबईत काल दादांची आणि माझी अनपेक्षित झालेली भेट शेवटची ठरेल असे वाटले नव्हते. या भेटी दरम्यान दादांनी दिलेला कानमंत्र नेहमी लक्षात राहील. राजकारण आज आहे उद्या नाही. तुला नशिबाने देवेंद्रजी यांच्यासारखा चांगला नेता मिळाला आहे. त्यांच्याशी प्रामाणिक राहा. वेळेचे नियोजन करा. तब्येत सांभाळा. कार्यकर्ते तर येतच राहतील, पण परिवाराला वेळ द्या, असे त्यांनी सांगितले. शहराच्या राजकारणावरही आमची चर्चा झाली. त्यांच्या निधनाच्या बातमीचा धक्का मी अजूनही सहन करतोय.
- अमित गोरखे, आमदार, विधान परिषद
---
आम्ही सगळे पोरके झालो आहोत. संपूर्ण राज्य एका पालकाला मुकले आहे. लाखो गरिबांचा पोशिंदा आज गेला. ते पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार होते. त्यांची प्रशासनावर पकड होती. पहाटे पाच वाजता उठून कामाला सुरवात करणारा असा नेता पुन्हा होणार नाही. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे. प्रत्येक कार्यक्रमाला वेळेवर पोचणाऱ्या दादांना परमेश्वर आज वेळेआधीच घेऊन गेल्याचे दुःख आहे.
- योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड
---
मी १९९२ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीला पहिल्यांदा सामोरा जाणार होतो. उमेदवारी मिळणार की नाही याची शाश्वती नव्हती. फुरसुंगी येथील एका बैठकीदरम्यान मी दादांना भेटायला गेलो. त्यावेळी महापालिकेसाठी पहिली उमेदवारी दादांनी जाहीर करत माझ्या राजकीय प्रवासाला चालना दिली. केवळ मीच नव्हे, तर पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश नेतृत्व अजित दादांनी तयार केले आहे.
- भाऊसाहेब भोईर, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका
---
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. माझ्या राजकीय जीवनात त्यांनी मोठी ताकद दिली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जपणारे त्यांचे नेतृत्व होते. त्यांचे निधन दुःखदायक असून भावना व्यक्त करणे कठीण होत आहे.
- अजित गव्हाणे, माजी स्थायी समिती अध्यक्ष, पिंपरी चिंचवड महापालिका
---
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहवास लाभला. मी पाच वर्षांपासून त्यांच्या संपर्कात आलो होतो. पक्ष प्रवेश करण्याआधी मला वैयक्तीक एक तास वेळ देऊन त्यांनी चर्चा केली होती. त्यानंतर अनेक वेळा अशा चर्चा झाल्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व मनमोकळे होते. मला मोटारीत घेऊन त्यांनी अनेक दौऱ्यांवर नेले होते. त्यांचा सहवास पुन्हा मिळणार नाही.
- संदीप वाघेरे, नगरसेवक. पिंपरी चिंचवड महापालिका
---
मी १९८१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक झालो होतो. तेव्हा गुलाल घेऊनच ते माझ्या बहिणीच्या लग्नात आले होते. १९९१ पासून दादांच्या निवडणुकीत माझे वडील दिवंगत नानासाहेब शितोळे आणि मी सोबत होतो. माझ्या राजकीय जीवनात त्यांनी मला ताकद दिली. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत माझ्या निकालावर दादांचे सातत्याने लक्ष होते. पराभव झाल्यानंतर खचून न जाता लढत राहायचे असे बळ दिले.
- अतुल शितोळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

