पदाधिकाऱ्यांच्‍या प्रतिक्रिया

पदाधिकाऱ्यांच्‍या प्रतिक्रिया

Published on

अजित दादांबाबत घडलेल्‍या घटनेने मन सुन्न झाले आहे. २००७ मध्ये दादांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली. तिथून सुरू झालेला हा प्रवास केवळ राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तर ते एक अत्यंत कौटुंबिक आणि आपुलकीचे नाते बनले होते. सिंधी समाजातील माझ्यासारख्या व्यक्तीला नेतृत्वाची आणि काम करण्याची संधी देताना दादांनी कुठलाही भेदभाव पाळला नाही, ही गोष्ट कायम लक्षात राहणारी आहे.
- डब्बु आसवानी, माजी उपमहापौर

महापालिकेतील कोणतेही काम अडले तर ते मार्गी लावणारा एकमेव आधार म्‍हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. एखाद्या कामाबाबत बोलायचे असल्‍यास मोबाईलद्वारे संदेश पाठविला तरी दादा संपर्क करत अडचणी विचारत होते. विचारपूस करत होते. आयुक्‍तांकडे आपली माणसे पाठवून कामे मार्गी लावायचे. माझ्या प्रभागात चार जणांची उमेदवारी निश्‍चित असल्‍याबाबतचा सातत्‍याने विश्‍वास द्यायचे. त्‍यांच्‍या निधनाने आमची मोठी हानी झाली.
- राहुल भोसले, नगरसेवक

कोकणातून पिंपरी चिंचवड मध्ये आलेल्‍या माझ्यासारख्या सर्वसामान्‍य माणसाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे केले. मी त्‍यांच्‍या नात्‍याचा नसलो तरी ताकद दिली. २००७ मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या अरुण गुजराथी यांनी महापालिकेसाठी पिंपरीत त्‍यांच्‍या नातेवाइकांना उमेदवारी मागितली होती. मात्र अजित दादांनी मला उमेदवारी देऊन न्‍याय दिला. नंतर महापौर, विरोधी पक्षनेता केले. त्‍यांचे अचानक जाणे मनाला न पटणारे आहे.
- राजू मिसाळ, नगरसेवक

अजित दादांनी २००२ च्‍या दरम्‍यान तीस वयाच्‍या आतील अनेक नवीन तरुणांना नगरसेवक केले. त्‍यामध्ये सर्वात तरुण नगरसेवक म्‍हणून माझा समावेश होता. शहरातील प्रत्‍येक महत्त्वाच्या निर्णयात मला सहभागी करून घेत होते. राजकीय निर्णय घेताना आमच्‍याशी चर्चा करायचे. त्‍यांच्‍याशी संबंधित अनेक आठवणी आहेत.
- प्रशांत शितोळे, माजी स्‍थायी समिती अध्यक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍यामुळे राजकीय ताकद तर मिळालीच. मात्र त्‍यापेक्षा महत्त्वाचे म्‍हणजे त्‍यांनी कौटुंबिक आधार दिला. माझ्या वडिलांच्‍या निधनानंतर त्‍यांची उणीव अजित दादांनी कधीच भासू दिली नाही. कुटुंब म्‍हणून आमचा सांभाळ केला. त्‍यांच्‍या निधनाने कौटुंबिक हानी झालेली आहे.
- मयूर कलाटे, माजी नगरसेवक

विरोधकांना आणि समर्थकांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत हळूहळू राजकारणाला वेगळा मानाने घडवून आणणारी होती. त्यांच्या सामाजिक समजुतींनी व सुलभ संवादाने अनेक समस्या शमविल्या गेल्या. पिंपरी चिंचवडचा विकास आणि लोकांसाठी सेवा हे त्यांच्या कार्याचे मुख्य ध्येय होते. त्यांच्या जाण्याने शहर आणि राज्यासाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या योगदानाची आठवण सर्वत्र आदरात ठेवली जाईल.
- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com