चिंचवड, मोशी परिसरांत बंद
पिंपरी, ता. २९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता.२९) बंद पाळला. तर, चिंचवडसह मोशी परिसरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. त्यामुळे शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. बुधवारी (ता.२८) पिंपरीसह चिंचवडचे मार्केट बंद होते. तर, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.
‘‘बारामती माझी जन्मभूमी असली, तरी पिंपरी चिंचवड माझी कर्मभूमी आहे,’’ असे अजित पवार आपल्या भाषणातून नेहमीच सांगत. शहराच्या सर्वांगीण विकासात अजितदादांचे मोठे योगदान आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांतही त्यांचा दबदबा राहिला. अजित पवार यांच्या निधनाने पिंपरी चिंचवडकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आणि व्यापारी, काही उद्योग संघटनांनी गुरुवारी (ता.२९) सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी स्वःतहून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. कापड विक्रेते, ज्वेलर्स यांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवली होती. काही शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली होती. तसेच गुरुवारी होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या.
ठिकठिकाणी श्रद्धांजली सभा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्यामुळे विविध कामांसाठी ते पिंपरी चिंचवड शहरात येत असत. शहरातील पाणी प्रश्न, हिंजवडी आयटी पार्कमधील विविध समस्या किंवा चाकण एमआयडीसीतील रस्ते, कचरा आणि वाहतूक कोंडीची समस्या असो. त्या सोडविण्यासाठी अजित पवार यांनी वेळोवेळी ‘पीएमआरडीए’ आणि विविध यंत्रणांच्या बैठका घेऊन नागरिकांना दिलासा दिला. त्यामुळे अजित पवार यांच्याबद्दल नागरिकांमध्ये मोठा आदर होता. या नेत्याच्या अकाली जाण्याने अनेकांना धक्का बसला. या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी शहरातील विविध ठिकठिकाणी श्रद्धांजली सभा घेण्यात येत होती. त्यांच्या विविध कार्यांबाबतच्या आठवणींना अनेकांकडून उजाळा दिला गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

