फुगे विक्रेत्या जखमी मुलावरील शस्त्रक्रिया यशस्वी
पिंपरी, ता. २९ ः भरधाव ट्रकच्या धडकेने जखमी झालेल्या १३ वर्षीय फुगे विक्रेत्या मुलाचे प्राण आयटीयन्सने दाखविलेल्या माणुसकीमुळे अखेर वाचले. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनीही संवेदनशीलता दाखवून त्वरीत सहकार्य केल्याने त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
हिंजवडीतील फेज ३ मधील मेगापोलिस सर्कलजवळ रविवारी (ता.२५) हा अपघात झाला होता. तेथील रहिवासी व आयटीयन्स यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर, त्या जखमी मुलाला रुग्णालयात नेण्यापासून उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यापर्यंतची आयटीयन्सने धडपड केली. या अपघातामुळे मुलाच्या पायाला गंभीर इजा झाली. आयटी कर्मचाऱ्यांनी त्याला लगेचच खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, दोन रुग्णालयांमध्ये आयसीयू उपलब्ध नसल्याने त्याच्यावर उपचार करता आले नाहीत. त्यानंतर या मुलाला पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, आर्थिक अडचणींमुळे मुलावर उपचार करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजच्या (एफआयटीई) सदस्यांनी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. म्हसे यांनीही संचेती रुग्णालयाच्या वरिष्ठांशी संपर्क साधून या मुलाचे उपचार आर्थिक कारणास्तव थांबवू नयेत याचे निर्देश दिले. संबंधित मुलावर तातडीची शस्त्रक्रिया झाल्याने या मुलाचे प्राण वाचले. मात्र, इथपर्यंत न थांबता एफआयटीईच्या सदस्यांनी त्याची उपचारासाठी आवश्यक रक्कम मिळवून देण्यासाठीही मोहीम सुरू केली आहे. उपचाराचा एकूण खर्च ३ लाखांच्या घरात आहे. परिस्थितीमुळे त्याच्या पालकांना ही रक्कम भरणे शक्य नाही. त्यामुळे ‘डोनेशन ड्राइव्ह’ सुरू करत आयटीयन्सनी सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले आहे.
‘मुलाचा जीव वाचविण्यासाठी लगेचच उपचार होणे गरजेचे होते. दोन खासगी रुग्णालयात आयसीयू खाटा नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत. यावेळी डॉ. योगेश म्हसे यांनी समन्वय साधल्याने पुण्यातल्या संचेती रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले आणि त्याचे प्राण वाचले आहेत. आम्ही रुग्णालय प्रशासन व डॉ. म्हसे यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आभारी आहोत.
- आशुतोष पांडे, सदस्य, एफआयटीई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

