पोलिस आयुक्तालय आवारात
महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिस आयुक्तालय आवारात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published on

पिंपरी, ता. ३० : पानटपरी चालविणाऱ्या एका महिलेने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. एका तरुणाने शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल केल्याच्या तक्रारीची भोसरी एमआयडीसी पोलिस दखल घेत नसल्याचा आरोप तिने केला. या प्रकारानंतर अखेर संबंधित तरुणावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
सचिन डॅनियल खलसे (रा. लांडेवाडी, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. ही ५० वर्षीय माहिला भोसरीतील लांडेवाडीतील रहिवासी आहे. लांडेवाडीतच तिची पानटपरी आहे. ती आत्मदहनाचा प्रयत्न करीत असतानाच आयुक्तालयातील पोलिसांनी तिला रोखले. त्यानंतरही तिने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेतला होता, पण पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर प्रकार टळला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीनुसार बुधवारी (ता. २८) रात्री आरोपी खलसे पानटपरीवर आला. त्याने सिगारेट आणि पाण्याची बाटली घेतली. महिलेने पैसे मागितले असता, ‘तुला पानटपरी चालवायची असेल तर प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुझी टपरी जाळून टाकीन आणि तुला मारून टाकीन,’ अशी धमकी त्याने दिली. त्याने जबरदस्तीने पाचशे रुपये खंडणी स्वरूपात घेतले. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास गुन्हा दाखल केला. यापूर्वीही या महिलेने शिवीगाळ व धमकी दिल्याबाबतच्या तीन तक्रारी पोलिस ठाण्यात केल्या आहेत.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com