महापौरपदी रवी लांडगे बिनविरोध?

महापौरपदी रवी लांडगे बिनविरोध?

Published on

पिंपरी, ता. २ : पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे यांची निवड निश्चित झाली. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यांचा एकमेव अर्ज सोमवारी (ता.२) नगरसचिवांकडे दाखल झाल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याची औपचारिक घोषणा शुक्रवारी (ता. ६) निवड प्रक्रियेच्या दिवशी होईल. मात्र, उपमहापौरपदाबाबत नाट्यमय घडामोडी घडल्या. सलग तीन वेळा निवडून आलेले नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांनी उपमहापौरपदाची उमेदवारी नाकारत महापालिकेतून काढता पाय घेतला. ऐनवेळी ज्येष्ठ नगरसेविका शर्मिला बाबर यांचे नाव पुढे आले आणि त्यांनी नगरसचिवांकडे उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी दाखल केला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने १२८ पैकी ८४ जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे त्यांचाच महापौर होणार हे निश्चित होते. मात्र, या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? विशेषतः चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लागणार? याची उत्सुकता होती. त्यावरून सत्तासूत्र कोणाकडे राहणार? हेही स्पष्ट होणार होते. या सर्व प्रकारावर सोमवारी पडदा पडला. महापौरपदासाठी रवी लांडगे व उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांनी नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप गटनेते प्रशांत शितोळे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे यांना झटका
चिंचवड, भोसरी व पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे आणि विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी वाटून घेतल्याचे चित्र आहे. अखेर भोसरी मतदारसंघातील विशेषतः भोसरीतील आणि तेही आमदार लांडगे यांच्या भावकीतील नगरसेवकाचे नाव महापौरपदासाठी भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने निश्चित केल्याने सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे आमदार लांडगे यांना मोठा राजकीय झटका असल्याचे बोलले जात आहे. कारण, रवी लांडगे यांना पक्षात घेण्यास त्यांचा विरोध होता. तरीही, पक्ष नेतृत्वाने रवी यांना पक्षात प्रवेश आणि उमेदवारीही दिली होती. आता त्यांनाच महापौरपद दिल्याने आमदार लांडगे यांना पक्षश्रेष्ठींनी दुसरा झटका दिला आहे. रवी लांडगे हे भाजपचे दिवंगत माजी शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहे. अंकुशराव लांडगे यांनी भाजपची शहरातील नगरसेवकांची संख्या एक अंकीवरुन दोन अंकावर नेली होती. त्यामुळे स्थानिकांचा विरोध असतानाही प्रदेशचे माजी संघटन सरचिटणीस आमदार श्रीकांत भारतीय यांनी रवी लांडगे यांना पक्षात आणले, तर; महापौरपदासाठी रवी लांडगे यांचे अंतिम करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष न्याय देतो, हेही दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे काटे यांना पत्र
सलग दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. त्याबाबतचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीचे पत्र भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना मिळाले. त्यात म्हटले आहे की, ‘‘पिंपरी चिंचवडच्या महापौरपदासाठी रवी बाबासाहेब लांडगे आणि उपमहापौरपदासाठी विजय उर्फ शीतल गोरख शिंदे यांची नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही करावी.’’

शिंदे यांचे नाराजीनाट्य
उपमहापौरपदासाठी सलग तीन वेळा भाजपच्या उमेदवारीवर एकमेव निवडून आलेले शीतल ऊर्फ विजय शिंदे यांचे नाव रवींद्र चव्हाण यांनी कळविले होते. मात्र, उपमहापौरपद नाकारून शिंदे यांनी महापालिकेतून काढता पाय घेतला. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक होते. कारण, महापौर व उपमहापौरपदासाठी सोमवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत नगरसचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक होते. शिंदे यांनी नकार दिल्याने ऐनवेळी कोणाचे नाव सूचवायचे व अर्ज दाखल करायचा? असे प्रश्न उपस्थित झाले. अखेर निगडी प्राधिकरण प्रभाग १५ मधून निवडून आलेल्या नगरसेविका शर्मिला बाबर यांचे नाव पुढे आले. त्यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अर्ज
महापालिकेत १२८ पैकी ८४ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे त्यांचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, महापौरपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे भाजपचा महापौर बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी (ता. ६) महापौर व उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा होणार आहे.

कोण आहेत रवी लांडगे
भोसरी प्रभाग सहा ‘ब’ जागेवरून रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आले आहेत. २०१७ मध्येही ते याच प्रभागातून बिनविरोध निवडून आले होते. मात्र, स्थायी समितीचे सभापती पद न दिल्याने त्यांनी उघडपणे भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व नंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. आता २०२५-२६ चा महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता.

चर्चा निष्फळ; झाले वेगळे
पिंपरी चिंचवडचे महापौरपद सर्वसाधारण (खुले) राहिले होते. तेव्हापासून अनेकांच्या नावांची चर्चा महापौरपदासाठी होती. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह काही दिग्गजांच्या नावांचा समावेश होता. शिवाय, भोसरीतील आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, पिंपरी विधानसभा मतदारसंघात लक्ष घातलेले विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांच्याही समर्थकांची नावे चर्चेत होती. आता सर्व चर्चांनाच पूर्णविराम मिळाला असून अनपेक्षितपणे पक्षश्रेष्ठींनी रवी लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

उपमहापौरपदासाठी माझे नाव पक्षश्रेष्ठींनी सूचविल्याची अधिकृत माहिती मला शहराध्यक्षांकडून मिळालेली नाही. काही जणांनी फोनद्वारे कळविले होते. महापौर किंवा उपमहापौरपदासाठी मी इच्छुक नव्हतो.
- शीतल उर्फ विजय शिंदे, नगरसेवक, भाजप
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com