वाहतूक, उद्योग क्षेत्राला फटका

वाहतूक, उद्योग क्षेत्राला फटका

Published on

अमोल शित्रे
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी ः वाहतूक आणि उद्योग क्षेत्राला कोंडीचा मोठा फटका बसला. वाहने कोंडीत अडकल्यामुळे दैनंदिन पुरवठ्यासाठी नेल्या जाणाऱ्या बऱ्याच मालाची नासाडी झाली. औद्योगिक क्षेत्रातील कच्चा माल, तयार उत्पादने घेऊन जाणारे मालवाहू ट्रक, मल्टी-अ‍ॅक्सल ट्रक, कंटेनर ट्रेलर, फ्लॅटबेड व बॉक्स ट्रक, टँकर यांच्यासह भाजीपाला, फळे, धान्य, साखर, कांदा, बटाटा यांसारखा शेतमाल वाहून नेणारे ट्रक व पिकअप वाहने, तसेच लॉजिस्टिक्स व कुरिअर कंपन्यांची वाहने अडकली. त्यामुळे उद्योजक, वाहनमालक, ट्रान्स्पोर्ट कंपनी मालक, शेतकरी, कंपनीचालक, कारखानदार यांच्यावर आर्थिक संकट कोसळले.

निर्यातीवर परिणाम
जेएनपीटी येथे उत्पादने नेणारी वाहने कोंडीत अडकली. पुरवठा क्षमता असूनही कोंडीमुळे उद्योजकांना उत्पादन व वितरण प्रक्रिया थांबवावी लागली. कोंडीचा सर्वाधिक फटका निर्यात केल्या जाणाऱ्या मालाला बसला. अनेक निर्यातदारांचा माल रस्त्यातच अडकून पडला. बंदरावर माल पोहोचविण्याच्या करारानुसार ठरलेल्या वेळा काही जणांना पाळता आल्या नाहीत. इतर अनेक निर्यातदारांच्याही मालाची डिलिव्हरी चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यात करार रद्द होणे, दंड आकारला जाणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील विश्वासार्हतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्पादन प्रक्रिया विस्कळित झाली असून कच्च्या मालाचा पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्यासह तयार मालाचा साठा गोदामातच अडकून पडण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम बाजारातील मागणी-पुरवठा साखळीवर झाला असून अनेक उद्योजक महत्त्वाच्या व्यावसायिक बैठका, निर्यात व्यवहार आणि पुरवठा करारांसाठी मुंबईतील बैठकांना वेळेत उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
---------

टँकर उलटल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने न घेणे अत्यंत खेदजनक आहे. उद्योग क्षेत्राला पुरवठा होणारा कच्चा माल, तयार उत्पादने रस्त्यामध्येच अडकून पडली आहेत. शेतमालाची बरीच नासाडी होण्याची शक्यता आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा मार्ग उपलब्ध नसणे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. पर्यायी मार्ग नसल्यामुळे वाहतूक क्षेत्राचे प्रचंड नुकसान होत आहे. वाहनचालक व वाहनमालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. मार्ग न मिळाल्याने आर्थिक नुकसान अटळ असून सरकारने भरपाई देण्याची तयारी दाखवावी, अशी आमची ठाम मागणी आहे.

- प्रमोद भावसार, अध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली

जड वाहने कोंडीत सलग दोन दिवस अडकल्यामुळे वाहनमालकांवर गाडीचे हप्ते, चालकांचे पगार तसेच वाहनाच्या देखभाल व दुरुस्तीचा अतिरिक्त बोजा पडला आहे. विलंबाची कारणे ऐकून घेण्यास ग्राहक तयार नसल्याने भरपाई मिळणे कठीण झाले आहे. उलट विलंब शुल्क आकारले जाण्याची भीती आहे. काही चालकांना किलोमीटरप्रमाणे, तर काहींना दिवसावर पगार दिला जातो. त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. दैनंदिन पुरवठ्याचा माल खराब होण्याची शक्यता आहे. जेएनपीटीसह तमिळनाडू व कर्नाटकहून येणारे निर्यात मालाचे कंटेनर अडकले आहेत. या परिस्थितीस सरकार जबाबदार आहे. पर्यायी व्यवस्था केली असती तर इतकी गंभीर अवस्था उद्भवली नसती.

- अनुज जैन, सचिव, असोसिएशन ऑफ ट्रान्स्पोर्ट, पूना

मला बुधवारी कामासाठी मुंबईला जायचे होते, मात्र पोहोचता आले नाही. पर्यायी मार्गांवरही मोठी कोंडी असल्याने प्रचंड गैरसोय झाली. अखेर काम लांबणीवर टाकावे लागले. यामुळे मला वैयक्तिकरित्या आर्थिक फटका बसेल. माझ्यासारख्या असंख्य उद्योजकांना कोंडीमुळे महत्त्वाचे निर्णय मागे घ्यावे लागले आहेत. बुधवारपासून तीन दिवस पुरवठा करण्यासाठी घेतलेल्या ऑर्डर रद्द कराव्या लागत असून त्याचा थेट परिणाम कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर होत आहे.
या नुकसानाची भरपाई कोण देणार ? पर्यायी मार्गांची प्रभावी व्यवस्था करण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळेच उद्योजकांना या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटना
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com