इंग्रजीने बारावीची सलामी विद्यार्थ्यांसाठी संमिश्र

इंग्रजीने बारावीची सलामी विद्यार्थ्यांसाठी संमिश्र

Published on

पिंपरी, ता. १० ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेला मंगळवारपासून (ता. १०) इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरवात झाली. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ताण, दडपण अन थोडा उत्साह अशा संमिश्र भावना होत्या. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने ही सलामीही संमिश्र ठरली. पेपर काहींना अवघड, काहींना मध्यम, तर काहींना सोपा गेला. काही विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेतील बदलत्या स्वरूपामुळे थोडा आणखी वेळ हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड शहरातील ३५ परीक्षा केंद्रावर ३३ हजार ७३३ परीक्षार्थी आहेत. सकाळी १० वाजता विद्यार्थी तसेच अनेक पालकही परीक्षा केंद्रांवर येण्यास सुरवात झाली. त्यामुळे बरीच गर्दी झाली होती. दिव्यांगांसाठी विशेष सोय होती. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांकडून कॉपी न करण्याची शपथ घेण्यात आली. त्यानंतरच साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात आले. परीक्षा केंद्रावर सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. सकाळी ११ वाजता पेपर सुरू झाला तर दुपारी २.१० वाजता सुटला. पेपर सोपा गेलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, तर अवघड गेलेल्यांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. त्यांनी पेपर सोडवण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याचे सांगितले.

परीक्षार्थीचे औक्षण
दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपक्रम राबविले जात आहेत. टिळा लावून, गुलाबपुष्प देऊन, औक्षण करून, साखर भरवून परिक्षार्थींचे स्वागत केले जात आहे. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना पेढेही वाटण्यात आले. पहिल्या दिवशी आपापल्या मित्र-मैत्रिणींना ‘बेस्ट लक’ देत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केला.


झेरॉक्स सेंटर बंद
परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम लागू केल्याने परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद होती. परीक्षा केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त होता. एकही कॉपीच्या गैरप्रकाराची नोंद नाही. शहरातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार न घडल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.


कॉपीमुक्तीसाठी कडक नियमावली
परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बोर्डाने कडक नियमावली तयार केली आहे. या नियमावलीची कडक अंमलबजावणी केल्याचे सर्वच केंद्रांवर दिसून आले. यंदा परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी कॅमेऱ्यांचा देखील वापर केला जात आहे. मोबाईलसह इतर कोणत्याच वस्तू परीक्षा हॉलमध्ये घेऊन येण्यास बंदी होती. पेपर सोडवण्यासाठी केवळ पारदर्शक पॅड नेण्यास परवानगी होती.


विद्यार्थी म्हणाले
‘इंग्रजी विषयाचा पेपर तसा अवघड होता, पण काही प्रश्‍न खूप सोपे होते. पेपर लिहीत असताना वेळ पुरेल की नाही असे वाटत होते. एकंदरीत पेपर ठीक होता. पुढील पेपर सोडवण्यासाठी आत्मविश्वास वाढला.
- सचिन वाळुंज, १२ वी विज्ञान, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चिंचवड स्टेशन

आजचा पूर्ण पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला. शेवटचा प्रश्‍न थोडा राहिल्याने थोडा वाईट वाटत आहे. वेळेचे योग्य नियोजन करता आले नाही. शिक्षकांनी तयारी करून घेतल्यामुळे पेपर सोडवताना कुठल्याही प्रकारे भीती वाटली नाही.
- शिवानी प्रजापती, १२ वी वाणिज्य, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चिंचवड स्टेशन

पहिलाच पेपर होता. मनामध्ये खूप भीती होती. पेपर कसा असेल... पण मी वर्षभर केलेला अभ्यास आणि मनामध्ये असलेला आत्मविश्वास मुळे मला इंग्रजीचा पेपर खूपच सोपा गेला.
- लतिका वेताळ, ज्ञानज्योती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय

इंग्रजीचा पेपर तसा सोपा होता आज माझ्या कौशल्याने पेपर छान प्रकारे लिहिता आला. परीक्षा केंद्रावर कॅमेरे, भरारी पथक, एकंदर

शिस्त पाहून थोडी मनामध्ये भीती होती. परीक्षा शिस्तीत व भीतीच्या वातावरणात पार पडले.
- साक्षी गरड, ज्ञानज्योती माध्य आणि उच्च माध्यमिक विद्यालय

id: 30057

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com