

व्यवसायाच्या नावाखाली ६६ लाखांची फसवणूक
पिंपरी : आयात-निर्यात आणि बांधकाम व्यवसायाचे आमिष दाखवून ६६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार हिंजवडी व औंध परिसरात घडला. या प्रकरणी गणेश बारणे (रा. जय भवानीनगर, थेरगाव), ज्ञानेश शिंदे (रा. प्रियदर्शनी सोसायटी, पाषाण) आणि भरत बानखेले, (रा. सेवागिरी नगरी सोसायटी,मंचर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती सावंत (वय ४०, रा. भोईरवाडी, माण, ता. मुळशी) यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. त्यांनी सोमवारी (ता. ९) याबाबत हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना व्यवसायाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ६६ लाख रुपये घेतले. त्यासाठी बँक कर्जही काढले. मात्र, कोणताही व्यवसाय न करता फसवणूक केली. तपास हिंजवडी पोलीस ठाणे करत आहे.
मोटार बळकावून बनावट कागदपत्रांद्वारे विक्री
पिंपरी : लग्नासाठी गाडी मागून घेतली. तसेच बनावट कागदपत्रे तयार करून आलिशान गाडी विकून १२ लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चिंचवड परिसरात उघडकीस आला आहे. अविनाश बोराडे (वय ३२), अमर चरवड, विनोद पवार आणि भालचंद्र थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील थोरात याला अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश महापुरे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे फसवणूक झालेल्याचे नाव असून त्यांनी सोमवारी (ता. ९) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘२० सप्टेंबर २०२५ रोजी आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून लग्न कार्यासाठी त्याची १२ लाख रुपयांची स्कार्पिओ गाडी नेली. मात्र, ती परत न करता त्या गाडीची बनावट आरसी, आधार व पॅनकार्ड तयार करून ती परस्पर विकली.’
कॅमेरा परत न करता फसवणूक
पिंपरी : भाड्याने घेतलेला कॅमेरा परत न करता फसवणूक करण्यात आली. हा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. अंकित राणे (रा. फेज ३, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ओंकार जंगम (वय २७, रा. पुणे कॅम्प) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सोमवारी (ता. ९) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून सव्वादोन लाखांचा कॅमेरा व इतर साहित्य भाड्याने घेतले. मात्र, मुदत उलटल्यावरही ते परत केले नाही.
तडीपार गुंडाला अटक; कोयता जप्त
पिंपरी : तडीपार आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या, तसेच कोयता बाळगलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. ९) पहाटे कोकाटे वस्ती, बावधन येथे करण्यात आली. शंकर तोडकर (वय ४३, रा. कोकाटे वस्ती, बावधन) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस अंमलदार कपिलेश पाटील यांनी सोमवारी बावधन पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोडकर याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र, परवानगी न घेता तो शहरात आला होता. तसेच कोयता बाळगून तो आरडाओरडा करत होता.
गोडुंब्रे गावात हातभट्टीवर पोलिसांचा छापा
पिंपरी : शिरगाव परिसरातील गोडुंब्रे गावात गावठी दारू तयार करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकून १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. ८) रात्री करण्यात आली. आकाश लोंढे (वय २८, रा. खानापूर, ता. परंडा, जि. धाराशिव) आणि संदीप राठोड (वय २७, रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.