

पिंपरी, ता. १० : ‘‘भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा उपयुक्त आहेत. त्या परीक्षांचा पाया असलेल्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षांना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे. दैनंदिन अभ्यासाचा सराव, पाढे पाठांतर, अवांतर वाचन, मनन व चिंतन केल्यास हमखास यश मिळते. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, जिज्ञासूवृत्ती व आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते,’’ असे मार्गदर्शन शालेय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञांनी व्यक्त केला.
निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ व मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी यांच्यातर्फे आयोजित पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे. निगडी प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर वाढोकार सभागृहात कार्यशाळा झाली. त्यात प्रा. स्मिता माने (बुद्धिमत्ता चाचणी व गणित), आबासाहेब पाळवदे (प्रथम भाषा मराठी), प्रा. नीता शेटे (इंग्रजी). गणित अभ्यासक लक्ष्मण गोगावले (गणित) आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी, मॉडर्न हायस्कूल निगडी, शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम शाळा यमुनानगर, मनोरम प्राथमिक शाळा केशवनगर, मॉडर्न हायस्कूल निगडी, न्यू इंग्लिश स्कूल देहूगाव, प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम स्कूल शिरगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघोजे ता. खेड, श्री गुरुगणेश विद्या मंदिर निगडी या शाळांमधील चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
मातृमंदिर विश्वस्त संस्था सहकार्यवाह सुधीर कुलकर्णी यांच्यासह सहभागी शाळांमधील उपशिक्षक अविनाश शिरसाट, मानसी सोनार, मरिया रॉबिन, सिद्धाली संगई, वैशाली पोफळे, साधना राऊत, अर्चना जाधव, आनंद सुतार, पूनम काळे, रेश्मा बनसोडे, काळुराम पवार, ज्योती कुलकर्णी, स्मिता खोल्लम, पौर्णिमा कुसाळकर, राजेंद्र पुराणिक, अनिल राजपूत आदी उपस्थित होते. मातृमंदिर विश्वस्त संस्था कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ एनआयई़’चे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल सराफ यांनी संयोजन केले.
मार्गदर्शक म्हणतात...
शालेय शिष्यवृत्ती परीक्षेला अवांतर वाचनाचा अधिक फायदा होतो. पाठ्यपुस्तकातील घटकांचा सखोल अभ्यास करावा. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय लागते. अभ्यासाची गोडी वाढविण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे विषय महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
- स्मिता माने, मार्गदर्शक, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय
शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजीचा पेपर अधिक गुण मिळवून देणारा आहे. शब्दसंपत्ती, शब्दसंग्रहावरील प्रभुत्व आणि वाक्यरचना अचूक करता आली पाहिजे. आत्मविश्वास व दररोज सरावामुळे पेपर सोडविण्यातील सहजता वाढते. ९० मिनिटांत ७५ प्रश्नांचे गणित जुळविणे शक्य होऊ शकते.
- नीता शेटे-खोडदे, न्यू इंग्लिश स्कूल, वडगाव मावळ
गणित विषय सोपा असून त्याची भीती बाळगू नका. त्याला छंद म्हणून जोपासा. त्यामुळे तो अधिक आनंददायी होतो. विद्यार्थ्यांनी दररोज सराव केल्यास नकळत गणित विषयाची भीती कमी होण्यास मदत होते.
- लक्ष्मण गोगावले, गणित अभ्यासक व मार्गदर्शक
शिष्यवृत्ती परीक्षेत भाषा विषयासाठी शब्द संपत्तीचा अधिकाधिक संग्रह केला पाहिजे. समानार्थी शब्द, म्हणी यासारख्या गोष्टींचे वाचन केले पाहिजे. त्यासाठी ग्रामीण व शहरी साहित्याचे वाचन केले पाहिजे. मराठी प्रथम भाषा विषयाला अधिकाधिक प्राधान्य दिले पाहिजे.
- आबासाहेब पाळवदे, साईजीवन प्राथमिक कन्या शाळा, जाधववाडी
शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना...
- भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा पाया असल्याने आत्मविश्वासाने परीक्षा द्या
- पाढे पाठांतर उत्तम असावे, शिवाय सर्व सूत्र पाठ करा
- संख्यांचे वर्ग, घन आणि त्रिकोणमितींचे सूत्रांचे पाठांतर व मनन करा
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा सराव उत्तम प्रकारे करा
- प्रश्नांचे चारही पर्याय व्यवस्थित वाचा, पेपर सोडविताना घाई करू नका
- नियमित वाचन करावे, यामुळे शब्दसंग्रह वाढण्यास मदत होते
- मजकूर, उतारा तयार करणे, जाहिरात व बातमी वाचन महत्त्वाचे आहे, त्यामुळे
- वाक्यरचना, परिच्छेद रचना कळतात
- पाठ्यपुस्तकांचा अभ्यास सखोल पद्धतीने करणे आवश्यक
- सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी अवांतर वाचन करा
- बुद्धिमत्ता चाचणी विषयाची तयारी करताना निरीक्षण क्षमता वाढवा, नियमित अभ्यासाचा सराव करा
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.