दोन वर्षे उलटूनही बर्न वॉर्डचे काम अपूर्णच

दोन वर्षे उलटूनही बर्न वॉर्डचे काम अपूर्णच
Published on

पिंपरी, ता. १० ः दुर्घटनेत भाजलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी तालेरा रुग्णालयातील जळीत उपचार कक्षाचे (बर्न वॉर्ड) काम दोन वर्षे उलटूनही अपूर्णच आहे. शहरातील अन्य महापालिका रुग्णालयांत बर्न वॉर्ड नसल्याने भाजलेल्या रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांत भरती करावे लागते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ रुग्णालयांतील एकाही रुग्णालयात बर्न वॉर्ड नाही. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेतील जळीतांवर उपचार करण्यासाठी त्यांना ससूनमध्ये पाठविणे महापालिका प्रशासनाला भाग पडते. हे टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने बर्न वॉर्ड तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे.
दोन वर्षापूर्वी तळवडे येथील मेणबत्त्या बनविण्याच्या कारखान्याला आग लागल्याने १५ कामगारांचा मृत्यू झाला होता. तेव्हा महापालिका रुग्णालयांत बर्न वॉर्ड नसल्याने रुग्णांना ससूनमध्ये हलविण्यात आले होते. भाजल्यानंतर रुग्णांना १५ मिनिटांत उपचार मिळणे आवश्‍यक असते. मात्र, बर्न वॉर्डअभावी या रुग्णांवर वेळेत उपचार झाले नाहीत. त्यावेळी महापालिका प्रशासन व वैद्यकीय विभागावर बरीच टीका झाली. त्यानंतर बर्न वॉर्ड उभारण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या. महापालिका रुग्णालयात सर्वेक्षण केल्यानंतर जुन्या तालेरा रुग्णालयातील जागा बर्न वॉर्ड साठी देण्याचा निर्णय झाला.
या रुग्णालयाचे स्थलांतर नवीन तालेरा रुग्णालयात करणे आवश्‍यक होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नवीन तालेरा रुग्णालयात जुन्या तालेरा रुग्णालयातील सर्व विभाग स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर येथील तिसऱ्या मजल्यावर बर्न वॉर्डचे काम स्थापत्य विभागाने हाती घेतले. नियोजित बर्न वॉर्डची क्षमता ३० खाटांची आहे. यामध्ये सहा खाटा अतिदक्षता विभागात आहेत. याशिवाय ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक हायड्रेशन कक्ष, प्लॅस्टिक सर्जरी सुविधा असेही विभाग उभारण्यात येणार आहेत. यासाठी सध्याच्या इमारतीत काही अंतर्गत बदल करणे गरजेचे आहे होते. मात्र, रुग्णालयाचे स्थलांतर आणि अंतर्गत रचना बदलण्याच्या कामाला विलंब झाला. याबाबतचे निर्णय होऊन दोन वर्षे उलटूनही बर्न वॉर्डची कमतरता कायम आहे.

तालेरा रुग्णालयात स्थापत्यच्या वतीने बर्न वॉर्ड उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. आमचे काम पूर्ण होण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर संबंधित कामासाठी कक्ष विद्युत विभागाकडे हस्तांतरित केला जाईल.
- चंद्रकांत मुठाळ, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग

तालेरा रुग्णालयात बर्न वॉर्ड उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण केव्हा होणार याची माहिती स्थापत्य विभागच देऊ शकेल.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com