

दागिने घडविण्याचा बहाणा, २६ लाखांची फसवणूक
पिंपरी : सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी तसेच नवीन दागिने घडविण्यासाठी ग्राहकांकडून दागिने आणि रोख रक्कम घेऊन दोघेजण पसार झाले. यात ४० हून अधिक लोकांची फसवणूक झाली. हा प्रकार देहूरोडमधील सुन्धा ज्वेलर्स येथे घडला.
या प्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अंबालाल जिवाजी सोनी आणि रोहित अंबालाल सोनी (दोघेही रा. विकासनगर, किवळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी आणि इतर साक्षीदारांकडून दुरुस्ती तसेच नवीन दागिने घडवण्यासाठी ६५७ ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असे एकूण २६ लाख ६० हजार १५० रुपयांचा ऐवज घेतला. मात्र, नंतर दागिने किंवा रक्कम परत न देता आरोपी दुकान बंद करून पसार झाले.
जादा परताव्याचे आमिष, १३ लाखांचा गंडा
पिंपरी : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सौरभ सुरेशचंद्र खटाटे (रा. रावेत) याच्यावर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ३८ वर्षीय महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या एका मित्राला गुंतवणुकीवर ५ ते ७ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. फिर्यादीने क्रेडिट कार्डद्वारे १५ लाख २५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर आरोपीने सुरुवातीला २ लाख ५ हजार रुपये परतावा म्हणून दिले. मात्र, उर्वरित रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली.
मारहाण प्रकरणी एकाला अटक
पिंपरी ः ‘आईकडे का पाहतोस’, असे म्हणत एकाने भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीला रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. या प्रकरणात मारहाण झालेल्या संतोष जालिंदर रणवरे (रा. ओटा स्कीम, निगडी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कामावरुन वाद, तरुणाला मारहाण
पिंपरी : डिलिव्हरी बॉयचे काम मागण्यावरून झालेल्या वादात दोघांनी मिळून एका तरुणाला मारहाण केल्याची घटना पिंपरी येथे घडली. या प्रकरणी कुणाल राजू वग्गे (रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुहान तांबोळी (रा.पिंपरी) आणि एका २० वर्षीय मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे.
दोन दुचाकींची धडक, तरुणाचा मृत्यू
पिंपरी : एका दुचाकीला दुसरी दुचाकी पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात पाठीमागील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई - बंगळुरू महामार्गावर बाणेर येथील बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ घडली.
हर्षवर्धन सुनील यादव (रा. बिलासपूर, छत्तीसगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हर्षवर्धन विनोद उसनाळे (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या हर्षवर्धन यादव याच्या दुचाकीची फिर्यादीच्या दुचाकीला धडक बसली. त्यात गंभीर जखमी झाल्याने हर्षवर्धन यादव यांचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.