

स्मार्ट सिटी की विद्रूपीकरण?
पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे उद्दिष्ट असताना शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या विद्रूपीकरणामुळे शहराच्या सौंदर्यावर तसेच नागरिकांच्या सुविधांवर परिणाम होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच, शहराचा विकास सुयोग्य नियोजनासह आणि नियमांचे पालन करूनच होणे गरजेचे आहे, तरच पिंपरी-चिंचवड खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी बनू शकेल.
-किशोर आटोळे, प्राधिकरण
PNE26W12933
पंधरा दिवसांपासून दिवे बंद
जुनी सांगवी येथील भाजी मंडई शेजारी असलेल्या श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील दोन दीपस्तंभ गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने या बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन दीपस्तंभ लवकर सुरू करावेत.
- मनोज पवार, पवारनगर, जुनी सांगवी.
PNE26W12932
मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली अस्वच्छता
निगडीतील टिळक चौकात असलेल्या मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली अनेक लोकांनी संसार थाटले आहेत. त्यामुळे पुलाखाली प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यातही या पुलाच्या बाजूला असलेले लोखंडी तारेचे मजबूत कुंपण गायब झाले आहे. कुंपणाचा काही भाग तिरका झाला आहे. त्यामुळे तेथील लोकांनाही तो धोकादायक झाला आहे. महानगरपालिकेने यावर योग्य ती कारवाई करावी.
- शिवराम वैद्य, निगडी
PNE26W12934
पदपथावर वाहनांचे अतिक्रमण
प्राधिकरण परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशस्त फूटपाथ उभारण्यात आले आहेत. मात्र, या पदपथाचा वापर पादचाऱ्यांऐवजी घरासमोर चारचाकी वाहने उभी करण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येते. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी.
- संजय मिस्त्री, निगडी
PNE26W12931
चेंबरचे झाकण खचले
चिंचवड येथील चापेकर चौक परिसरात गिरिधर वडापाव सेंटरजवळील चेंबरचे झाकण खचले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ज्येष्ठ नागरिक घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन चेंबरचे झाकण दुरुस्त करावे.
- यशवंत देशमुख, सांगवी
-PNE26W12929
गोविंद यशदा चौकात पदपथाची दुरवस्था
पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौकात पदपथाची दुरवस्था झाली असून पादचाऱ्यांना धोकादायक परिस्थितीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. काही कामानिमित्त पदपथ खोदण्यात आला होता; मात्र तो पूर्ववत न केल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे. झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडून पदपथावर येताना सिमेंट ब्लॉक निखळले असल्याने ये-जा करणे धोकादायक बनले आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून पदपथ सुरक्षित करावा.
- श्रुती राजे, पिंपळे सौदागर
PNE26W12928
कच्च्या रस्त्यामुळे धुळीचा त्रास वाढला
विप्रो सर्कलपासून मारुंजीकडे जाणारा कच्चा रस्ता सध्या वाहतुकीखाली असून त्यामुळे प्रचंड धुळ उडत आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना श्वास घेणेही कठीण होत आहे. तसेच वाहनांच्या टायरमुळे उडणाऱ्या दगडांमुळे नागरिकांना दुखापतींचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे सिमेंट किंवा डांबरीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात हा रस्ता अधिकच खराब होऊन पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
- पंडित भामरे, हिंजवडी फेज २
PNE26W12927
बस थांब्याजवळील चेंबर धोकादायक
चिंचवडगावहून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बस थांब्याजवळील चेंबरमध्ये कचरा साचला असून त्याची अवस्था धोकादायक झाली आहे. या चेंबरमध्ये बस किंवा इतर वाहनाचे चाक अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चेंबरची स्वच्छता व दुरुस्ती करावी.
- रमेश देव, चिंचवड
PNE26W12930
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.