

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ ः भारतीय जनता पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे कारभारी स्वतःला ‘पक्ष’ समजू लागले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात सतत चुका करून स्वतः तोंडघशी पडून पक्षाला अडचणीत आणत आहेत.
महापालिकेच्या १९८२ पासूनच्या इतिहासात भाजपने २०१७ मध्ये पहिल्यांदा सत्ता मिळवली. मार्च २०२२ मध्ये मुदत संपल्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे निवडणूक होऊ शकली नव्हती. चार वर्ष प्रशासकीय कारभार होता. आता निवडणूक होऊन सहा फेब्रुवारी रोजी भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली. त्यानंतर पक्षाचे कारभारी म्हणवून घेणारे आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे जणू सुसाट सुटले आहेत. यात महापालिका पक्षनेतेपदी निवड झालेले प्रशांत शितोळे, महापौरपदी विराजमान झालेले रवी लांडगे, स्थायी समिती सभापतीपदी आरूढ झालेले अभिषेक बारणे यांची भर पडली. गेल्या दोन महिन्यांत विषय समित्यांचे पदाधिकारीही मनमानीपणे वागू लागलेत आहेत. प्रत्येक जण पक्षाऐवजी आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला आहे. यातून कुरघोडीचे राजकारण सुरू होऊन संघटन म्हणून भाजप पक्ष मागे पडत आहे.
कारभाऱ्यांच्या चुका
१) सभाशास्राचे धिंडवडे ः महापौर निवडीच्या वेळी सभा सुरू असतानाच रवी लांडगे समर्थकांची सभागृहात घुसखोरी
२) रुसवे-फुगवे ः उपमहापौरपदासाठी पक्षाकडून नाव आलेल्या शीतल शिंदे यांनी ऐनवेळी नकार दिल्यामुळे धावाधाव, अखेर शर्मिला बाबर यांना संधी
३) निवड लांबणीवर ः विषय समित्यांवरील नावांबाबत वेळेत एकमत न झाल्याने प्रक्रिया लांबली
४) समित्या रखडल्या ः क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठ ऐवजी दहा करण्याचा ठराव, पण मुहूर्त न लागल्याने प्रभाग समित्या रखडल्या
५) स्वीकृत नियुक्ती लांबली ः सदस्यांची नावे निश्चित न झाल्याने दोन महिन्यांपासून सात (स्वीकृत) सदस्यांच्या नियुक्तीला मुहूर्त नाही
६) नियमांना तिलांजली ः सर्वसाधारण सभाशास्र धाब्यावर बसविल्याने मनोगत किंवा प्रस्तावावेळी बोलण्यावरून गोंधळ, कुणीही उठतो आणि बोलू लागतो अशी स्थिती
७) आधी चूक, मग माफीनामा ः सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर विषय नसूनही महापौरांकडून अर्थसंकल्प उपसूचनांसह मंजूर, नंतर माफी
८) अपहार ः स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना ‘बोगस’ उपसूचनांद्वारे ५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाल्याचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचा आरोप, पक्षनेता प्रशांत शितोळे यांचीही सूचक म्हणून स्वाक्षरी
९) मौन सोडणे भाग ः अपहाराबाबत भाजपच्या अन्य पदाधिकारी व कारभाऱ्यांचे मौन, ‘सकाळ’ने आवाज उठवल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देणे भाग
१०) सर्वाधिक बोगस उपसूचना महापौरांना उद्देशून असूनही त्यांचे मौन, मात्र स्थायी समिती सभापती अभिषेक बारणेच आक्रमक
११) चौकशी अंती १४ उपसूचना बोगस, त्यांद्वारे बिले काढून ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार
१२) ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक फेटाळले गेल्याने विरोधी पक्षांच्या निषेधासाठी महापालिकेत आयोजित आंदोलनात स्वपक्षाच्या अर्थात भाजप सरकाराच्याच विरोधात घोषणा
१३) महापालिका निवडणूक रिपब्लिकन पक्षासोबत लढवली, त्यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढले, त्यातील दोन निवडून आले. त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन व स्वतंत्र गट म्हणून स्थापना. कक्षाबाहेर गटनेत्याच्या व त्यांच्या पक्षाच्या नावाचा फलक
१४) भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या समर्थक नगरसदस्यांकडून सभागृह व स्थायी समिती सभांत एकमेकांचे मत खोडून काढण्याचा वांरवार प्रयत्न
१५) मराठी विषयात पदव्युत्तर पदवी झालेल्या कर्मचाऱ्यास दोन वेतनवाढीचा विधी समितीचा परस्पर निर्णय, स्थायीने थांबवला
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.