विधानसभा निवडणूक कर्मचाऱ्यांचा भत्ता थकीत
आशा साळवी
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १ ः महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली, तरी गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीचे अहोरात्र काम केलेल्या शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांना जादा कामाचा मोबदला निवडणूक आयोगाने अद्याप दिलेला नाही. भोसरी आणि पिंपरी विधानसभेच्या कर्मचाऱ्यांना भत्ता मिळाला तरी चिंचवड विधानसभेच्या कर्मचाऱ्यांचा अतिकालिक भत्ता अद्याप थकीत असल्याचे उघड झाले आहे. या कर्मचाऱ्यांची संख्या पाचशेच्या घरात आहे, तर थकीत भत्त्याची रक्कम सुमारे ७५ लाख रुपये आहे.
अगोदरच्या जादा कामाचा मोबदला मिळाला नसताना आता महापालिका निवडणुकीची जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चिंचवड विधानसभा कार्यालयाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने अन्याय होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. चिंचवड विधानसभेसाठी एका विभागाला ५०-५५ याप्रमाणे नऊ विभागांसाठी सुमारे ५०० कर्मचारी नियुक्त होते. त्यांचे प्रत्येकी १५ हजार रुपये थकीत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पारिश्रमिक, मानधन, अतिकालिक भत्ता देण्यात येतो. तथापि, मतदान, मतमोजणी भत्त्याचे वाटप करणारे, त्याबाबत वेतन पावती नोंदवहीचे काम करणाऱ्या लेखा कर्मचाऱ्यांना, मतदान अधिकारी व मतमोजणी सहाय्यकांना भत्ता मिळत नाही. मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. त्यामुळे त्यांच्या भोजनाची वा अल्पोपहाराची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो.
यांना मिळतो भत्ता
- मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेले पोलिस कर्मचारी
- कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलेले
- मतदानाचे साहित्य ताब्यात घेणारे
- मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष कार्यरत व राखीव अधिकारी
---
मलई असल्यास तत्परता !
कर्मचाऱ्यांना निवडणूक काळात वाहन, भोजन, साहित्य व इतर अनेक बाबींवर स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो. लोकशाहीचा कणा भक्कम ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांकडेच प्रशासन दुर्लक्ष करीत असेल, तर भविष्यात निवडणूक यंत्रणेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन भत्ता अदा करावा, अशी मागणी त्यांनी केली. ‘ज्या खर्चातून मलई मिळते, तेथे तत्परता दिसते; पण कर्मचाऱ्यांचा हक्काचा भत्ता देताना मात्र कार्यालय जणू झोपेचे सोंग घेत आहे का,’ असा सवाल एका कर्मचाऱ्याने उपस्थित केला.
--
ठोस हालचाल नाही...
त्रस्त झालेल्या एका निवडणूक कर्मचाऱ्याने सांगितले की, नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या चिंचवड विधानसभा निवडणूकीसाठी आम्ही रात्रंदिवस झटलो. निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडून अनेक महिने उलटूनही आम्हाला अतिकालिक भत्ता देण्याबाबत चिंचवड विधानसभा कार्यालयाने ठोस हालचाल केलेली नाही, ही बाब गंभीर असून कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
---
चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता मिळाला नाही, ही बाब खरी आहे. अद्याप आम्हाला कलेक्टर कार्यालयाकडून निधी प्राप्त झालेला नाही. मला आणि आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही अद्याप अतिकालिक भत्ता प्राप्त झालेला नाही, तरीही आम्ही कलेक्टर कार्यालयाच्या निवडणूक
विभागाकडे निधीसाठी पाठपुरावा केलेला आहे.
-अमोल कदम, सहाय्यक निवडणूक अधिकारी, चिंचवड विधानसभा निवडणूक कार्यालय
-----

