

पिंपरी, ता. २ : राज्यात तब्बल सात वर्षांनी महापालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची झालेली आहे. त्यामुळे ‘तिकीट’ देण्यापासूनच राज्यात रंजक घडामोडी घडत आहे. यावर भाष्य आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘डिजिटल माध्यम’ प्रभावी ठरत आहे.
निवडणूक म्हटली, की आरोप प्रत्यारोप टीका-टिपण्णी आलीच. मात्र, काळ बदलला तसा टीका करण्याची माध्यमेही बदलत आहेत. पूर्वी माध्यमे व्यंगचित्रे व चारोळ्यांमधून निवडणुकीत घडणाऱ्या घटनांवर टीका करत असत. त्यानंतर साधारण दहा वर्षांपूर्वी समाजमाध्यमांचा वापर वाढल्यानंतर व्हॉट्स ॲप मेसेज व्हायरल करून टीका व आरोप-प्रत्यारोप केले जात होते. याची जागा आता इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्सवरील मीम्स व रील्सने घेतली. मात्र, सध्या ‘एआय’निर्मित रील्स व्हायरल होत आहे. गेल्या तीन-चार दिवसांतील राजकीय घडामोडींवरील रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत.
निवडणुकीत बंडखोरी होऊ नये यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करणे टाळले. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्यांना शेवटच्या क्षणी मोठा धक्का बसला. यामुळे मोठा रोष दिसून आला. ही परिस्थिती अर्ज मागे घेतानाही दिसून आली. कोणत्या पक्षातून कोणत्या उमेदवाराने अर्ज भरला ? कोणाला उमेदवारी नाकाराली ? यासोबतच आघाडी, युती यांच्यातील फिस्कटलेली बोलणी या सगळ्या घटनांवर रील्सचा पाऊस पडला आहे. इच्छुकांचा प्रक्षोभ, बंडखोरी, उमेदवारी गेल्यानंतर अनावर झालेल्या भावना यांवरही यामध्ये भाष्य करण्यात आले आहे. वर्षोनुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे सर्वच पक्षांवर नेटकऱ्यांनी रील्समधून सडकून टीका केली.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर
निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासूनच सोशल मीडियावर राजकीय रील्सचा पूर आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानंतरची ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे. त्यामुळे एकमेकांवर टीका करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात आहे. राजकीय नेते, उमेदवार यांचे ‘एआय’ निर्मित फोटो व व्हिडिओ तयार करून सद्यःस्थितीवर भाष्य केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.