क्षणाची घाई, आयुष्याशी बेपर्वाई

क्षणाची घाई, आयुष्याशी बेपर्वाई
Published on

पिंपरी, ता. ३ : काही मिनिटांची घाई, थोडे अंतर कमी करण्याचा मोह आणि नियमांना हरताळ फासण्याची सवय, याचा थेट परिणाम म्हणजे शहरात वाढते अपघात आणि धोक्यात येणारे निष्पाप जीव. विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचा बेजबाबदार प्रकार दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नसून, तो स्वतःसह इतरांच्याही जिवाला धोका आहे. शहरातील काही प्रमुख रस्ते, एकेरी मार्ग, उड्डाणपुलाखालचे सेवा रस्ते, चौकाजवळील अरुंद रस्ते तसेच वर्दळीच्या बाजारपेठांमध्ये सर्रासपणे विरुद्ध दिशेने येणारी वाहने दिसून येतात. दुचाकीस्वार, रिक्षाचालक, खासगी चारचाकीच नव्हे तर काही ठिकाणी व्यावसायिक वाहनचालकही नियम झुगारून देत असल्याचे चित्र आहे.

क्षणात घडणारे अपघात, आयुष्यभराचा घाव
विरुद्ध दिशेने अचानक समोर येणारे वाहन हे समोरून येणाऱ्या वाहनचालकांसाठी अनपेक्षित असते. परिणामी, अचानक ब्रेक लागतो, वाहन घसरते, मागून येणाऱ्या वाहनांची धडक होते आणि काही सेकंदांत अपघात घडतो. अनेक घटनांमध्ये गंभीर दुखापती, हातपाय मोडणे, डोक्याला मार लागणे तर काही ठिकाणी मृत्यूदेखील झाले आहेत. विशेषतः दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय विरुद्ध दिशेने जात असल्याने अपघात झाल्यास जखमी होण्याचे प्रमाण अधिक वाढते. पादचाऱ्यांसाठी तर ही स्थिती अधिकच धोकादायक असून झेब्रा क्रॉसिंग, सिग्नलजवळ अचानक समोरून येणाऱ्या वाहनांमुळे त्यांचा जीव धोक्यात येतो.

ही कारणे केली जातात पुढे
‘फक्त थोड्याच अंतरावर जायचे आहे,’ ‘समोरून फेरी मारायला वेळ जातो,’ ‘सगळेच जातात,’ ‘फक्त यावेळी जाऊ द्या,’ अशा कारणांखाली नियम मोडले जात आहेत. मात्र, या मानसिकतेमुळे वाहतूक शिस्त कोलमडत असून, नियम पाळणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

पोलिसांची कारवाई, तरीही नियमभंग
वाहतूक पोलिसांकडून विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. मागील वर्षभरात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तेरा वाहतूक विभागाने ८६ हजार ७१६ वाहनांवर कारवाई केली आहे. कारवाई होत असतानाही नियमभंग करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.

‘‘विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास अपघाताचा धोका अधिक वाढतो. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

वाहतूक विभाग कारवाई
बावधन ३७०७
भोसरी ७५९५
चाकण ४८१६
देहूरोड ३७५६
दिघी-आळंदी ३८९३
हिंजवडी ९०४४
महाळुंगे ५६४१
निगडी ९०००
पिंपरी ७३५४
सांगवी १०३१२
तळेगाव ६४४०
चिखली ६५४४
वाकड ८६१४
एकूण ८६७१६
(२०२५ मधील कारवाई)

विरुद्ध दिशेने वाहने जाणारी शहरातील काही ठिकाणे
- चिंचवड स्टेशन येथून एम्पायर इस्टेट मोरवाडी चौकाकडे येणाऱ्या
मार्गाने विरुद्ध दिशेने येतात
- पिंपरीतील साई चौकाकडून भुयारी मार्गाने आल्यानंतर नाशिक फाट्याच्या दिशेला जाताना
- काळेवाडी फाट्यापासून सोळा नंबर बस थांब्याच्या दिशेला
- निगडीतील लोकमान्य टिळक चौकाकडून गावठाणच्या दिशेला जाताना
- त्रिवेणीनगर चौकाकडून ओटास्कीमच्या दिशेने जाताना
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com