‘इलेक्शन’ मुळे उमेदवारांमध्ये रंगले ‘कॅलेंडर वॉर’

‘इलेक्शन’ मुळे उमेदवारांमध्ये रंगले ‘कॅलेंडर वॉर’

Published on

भिंतीवरी कुणाचे कॅलेंडर लावावे?
मतदारांसमोर पेच! ‘इलेक्शन’मुळे रंगले ‘कॅलेंडर वॉर’
आशा साळवी
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३ ः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवार आणि विद्यमान लोकप्रतिनिधींनी नववर्षाचे कॅलेंडर वाटपाचा फंडा अवलंबला आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधींनी साडेचार वर्षांच्या कामाचा लेखाजोखाही या माध्यमातून मांडला आहे, पण दुसरीकडे मतदारांसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. घरात आठ-दहा कॅलेंडर येत असल्यामुळे भिंतीवर नेमके कोणत्या उमेदवाराचे कॅलेंडर लावायचे, अशा प्रश्‍न त्यांना पडला आहे.
शिवसेना, भाजप, काँग्रेसपाठोपाठ मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील उमेदवारांनी आपले प्रचाराचे मुद्दे, व्हीजन मांडण्यासह सत्ताधाऱ्यांच्या कामांचाही पंचनामा केला आहे. या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आघाडी-युतीच्या बिघाडीमुळे निवडणुकांचा फड चांगलाच रंगला आहे. युती-आघाडीमध्ये महापालिका जागावाटपाचा खल झाल्यानंतर आता निर्णायक टप्पा आला आहे. आता मतदारांपर्यंत पोचण्याचा धडाकाच उमेदवारांनी सुरू केला आहे. त्यासाठी नववर्षाची कॅलेंडर छापून घेतली जात आहेत. यात मतदानाची तारीख, आपली माहिती, आपले काम, पक्षाचा संदेशही त्यावर आहेत.
नववर्षाच्या शुभेच्छांसह प्रचार करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. कॅलेंडर तयार करण्याचे कामही जोरात सुरू आहे. सर्वात आधी आपले कॅलेंडर घरोघरी पोहोचवावे याकरिता जोरदार प्रयत्न होत आहेत. वर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीलाच मतदान होणार असल्याने तिळगुळाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचाही अनेकांचा मानस असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.


प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल

उमेदवारांनी कॅलेंडरच्या माध्यमातून विद्यमान नगरसेवकांसह प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करण्याची संधीही साधली आहे. सभामंडप, ग्रीन जिम उभारणे हे नगरसेवकाचे काम आहे का, याला काय विकास म्हणायचे का, असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. अनेक प्रभागात चार उमेदवारांनी अशी कॅलेंडर वाटून प्रचाराचा नारळ फोडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेकांनीही असाच फंडा वापरला आहे.
---


आताच रद्दी!
घरात कॅलेंडरचा जणू रतीबच सुरू झाल्यामुळे अनेकांनी आताच रद्दीचे दुकान गाठले आहे. ज्याला मत द्यायचे त्याचे किंवा ज्याचे आवडले ते कॅलेंडर भिंतीवर लावून मतदार मंडळींनी उरलेल्या कॅलेंडरना रद्दीचे दुकान दाखवत आहेत.
---
कॅलेंडर वाटपातून रोजगार
शेकडो उमेदवारांनी कॅलेंडरही मोठ्या संख्येने छापली आहेत. त्यामुळे सध्या प्रिंटिंग तसेच डीटीपी व्यवसाय जोरात आहे. आपलेच कॅलेंडर सर्वप्रथम मतदारांपर्यंत पोहोचावे, यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे. त्यामुळे कॅलेंडर वाटपही युद्ध पातळीवर केले जात आहे. त्यातून अनेकांना रोजगार मिळत आहे.
---
कॅलेंडरचा खर्च
कॅलेंडरचा खर्च प्रकार, आकार आणि वैशिष्ट्यांवर अवलंबून असतो. ५० रुपयांपासून अगदी पंधराशे रुपयांपर्यंत हा खर्च येतो. साधे कॅलेंडर स्वस्तात १०० ते १५० रुपयांत छापता येते. हेच पंचांग, छायाचित्रे किंवा खास डिझाइनचे कॅलेंडर छापायला प्रत्येकी १००० रुपयेही मोजावे लागतात. जास्त प्रति छापल्यास खर्च कमी होतो.
---
इमेज
82295

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com