

पिंपरी, ता. ११ : अमेरिका- इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाचा जबर फटका भारतीय उद्योगांनाही बसला आहे. तयार उत्पादन १५ दिवसांपूर्वी पाठवले, ते निश्चित ठिकाणी पोहचलेले नाही. पैसे भरूनही कच्च्या मालासह ॲल्युमिनियम, कॉपर अशा धातूंचा तुटवडा जाणवत आहे. तयार उत्पादने पडून आहेत. त्यातच सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठा थांबविल्यामुळे उद्योजक सर्व बाजूंनी अडचणीत आले आहेत.
पिंपरी चिंचवडमधील सुमारे १६ हजार लघु उद्योगांना युद्धाचा फटका बसला आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी, तसेच सरकारने तातडीने तोडगा काढून औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने पिंपरी येथे बुधवारी (ता.११) पत्रकार परिषदेत मुद्दे मांडले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, संचालक संजय सातव आदी उपस्थित होते.
बेलसरे म्हणाले, ‘‘दहा दिवसांच्या युद्धामुळे देशात व्यावसायिक गॅस पुरवठा थांबविण्याची वेळ आली आहे. हा सिलिंडर मिळत नसल्याने उद्योगांना फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेऊन यातून मार्ग काढावा. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांना आधार देणे आवश्यक आहे. शहरातील एमआयडीसीला पाइप गॅसद्वारे पुरवठा केला जात नाही. ही सेवा सुरू करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.’’
कड म्हणाले, ‘‘उद्योगांसाठी सिलिंडरचे दर वाढत आहेत. १८०० चा सिलिंडर पाच हजारांना मिळत आहे. यावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही. जर पुढील तीन ते चार दिवस अशीच परिस्थिती राहिली तर शहरातील उद्योग ठप्प होतील. त्यामुळे उद्योजक, पुरवठादार आणि कामगारांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे आहे.’’
धोरण ठरवणे आवश्यक
‘‘सध्याच्या इंधन तुटवड्याच्या परिस्थितीवरून बोध घेऊन घेऊन सरकारने भविष्यासाठी काहीतरी धोरण ठरवणे गरजेचे आहे. कोरोना लॉकडाऊन काळात उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या चार-पाच वर्षांत पुन्हा घडी बसली होती. मात्र, आता पुन्हा तेच संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारने इंधन पुरवठ्याबाबत तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे,’’ असे आवाहन यावेळी संघटनेतर्फे करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.