

उघड्या चेंबरमुळे अपघाताचा धोका
तळेगाव-चाकण महामार्गावरील मावळ लँड वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या मध्यभागी चेंबर उघडे असल्याने वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या चेंबरवर कोणतेही मजबूत आवरण नसल्याने स्थानिक हॉटेलचालकाने कल्पकतेने त्यावर लोखंडी फ्रेम ठेवून त्यावर ‘मसाला दूध’ असा फलक लावला आहे, जेणेकरून वाहनचालकांनी वेग कमी करून जावे. मागील पाच ते सहा वर्षांपासून या संदर्भात अनेक वेळा लेखी निवेदने देऊनही चेंबरची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हा धोका दूर करावा.
-दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
02994
इंद्रायणी नदीकाठी कचरा जाळल्याने वायुप्रदूषण
चिखली गावातील जल शुद्धीकरण केंद्राच्या पलीकडे इंद्रायणी नदीकाठी दररोज कचरा जाळला जात आहे. कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर, दुर्गंधी आणि गंभीर वायुप्रदूषण निर्माण होत आहे. या धुरामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कचरा जाळणे हे पर्यावरण आणि आरोग्यासाठी धोकादायक असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन कचरा जाळण्यावर प्रतिबंध करावा.
- नीलेश बोराटे, चिखली, पाटीलनगर
02972
भोंडवेनगर-वाल्हेकरवाडी येथे रस्त्यावरील दिवे बंद
भोंडवेनगर-वाल्हेकरवाडी येथील सर्व्हे नंबर ११९ मधील गणपती मंदिराजवळील रस्त्यावर बसविण्यात आलेल्या तीन दिव्यांपैकी एक दिवा बंद आहे. उर्वरित दोन दिवे सुरू असले तरी ते अत्यंत मंद प्रकाश देत असून त्यांची दिशा चुकीची असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश पडत नाही. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन बंद दिवा सुरू करावा तसेच इतर दिव्यांची दुरुस्ती करावी.
- लक्ष्मण कुलकर्णी, रावेत
02992
तुटलेल्या चेंबरमुळे सांडपाणी ओढ्यात
चऱ्होली येथील ताजणे मळा परिसरात ओढ्यातील मुख्य ड्रेनेज लाइनचा चेंबर तुटल्यामुळे मैलामिश्रित सांडपाणी थेट ओढ्यात वाहत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून तीव्र दुर्गंधी पसरत आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने तातडीने कारवाई करून तुटलेला चेंबर दुरुस्त करावा आणि ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी.
- निर्गुण थोरे, चऱ्होली
02993
एल्प्रो स्कूलसमोर रस्त्यात खड्डा; अपघाताचा धोका
चिंचवडमधील श्रीधरनगर येथील मुख्य रस्त्यावर एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या मध्यभागी पूर्वी ब्लॉक बसविण्यात आले होते. मात्र, हे ब्लॉक काढून टाकल्यामुळे या ठिकाणी खड्डा पडला आहे. या रस्त्यावरून शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी तसेच सतत वाहतूक सुरू असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने दखल घेऊन त्या ठिकाणी पुन्हा ब्लॉक बसवून रस्त्याची दुरुस्ती करावी.
- मधुकर कांबळे, चिंचवड
02990
तुटलेल्या जाळीमुळे अपघाताचा धोका
सांगवी फाटा येथील भुयारी मार्गातून जात असताना पाणी निचरा होणाऱ्या पहिल्या मार्गिकेवरील लोखंडी जाळी तुटलेली आहे. या तुटलेल्या जाळीमुळे दुचाकी चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन तुटलेल्या लोखंडी जाळीची दुरुस्ती करावी.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
02989
मोशीतील अपूर्ण रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त
मोशी परिसरातील टिपटॉप हॉटेल ते यशविन एन्कोअर सोसायटी दरम्यान सुमारे ३०० ते ४०० मीटरचा रस्त्याचा पट्टा अद्याप पूर्ण करण्यात आलेला नाही. या ठिकाणी रस्ता खडीचा, उखडलेला आणि असमतल अवस्थेत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा रस्त्यामुळे वाहन चालवणे धोकादायक बनले असून अपघाताची शक्यता देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या रस्त्याचे डांबरीकरण करून समस्या सोडवावी.
- प्रवीण महेशकर, वाकड
02991
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.