‘बिनविरोध’ निवडीची टांगती तलवार
पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ : राज्यातील विविध महापालिकांमध्ये बिनविरोध ठरलेले ६९ उमेदवार कायदेशीर अडचणीत येऊ शकतात. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या दोन उमेदवारांचाही समावेश आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आणि महापालिका निवडणूक विभागाचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील महापालिकांमध्ये बिनविरोध ठरलेल्या उमेदवारांचे अधिकृत निकाल मतमोजणी अर्थात १६ जानेवारीपर्यंत जाहीर केले जाणार नाहीत. परंतु, निवडणूक आयोगाने त्यांची माहिती मागितली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सद्गुरूनगर- धावडेवस्ती प्रभाग सहामधील ‘ब’ जागेवर एकमेव उमेदवार राहिलेले रवि लांडगे आणि संभाजीनगर- शाहूनगर- मोरवाडी प्रभाग १० मधील ‘ब’ जागेवरील सुप्रिया चांदगुडे यांचा अहवाल संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह महापालिका निवडणूक विभागाने तयार करून राज्य निवडणूक आयोगाला पाठवला आहे. त्यावर निवडणूक आयोग अर्थात निवडणूक आयुक्त काय निर्णय घेतात? दोघांची निवड बिनविरोध ठरते, की त्यांची निवड अपात्र ठरते? हे निवडणूक निकालाच्या दिवशी अर्थात १६ जानेवारी रोजीच कळेल. कारण, राज्यातील विशेषतः मुंबई, ठाण्यातील बिनविरोध विजयी उमेदवारांच्या विरोधात तक्रारी प्राप्त आहेत. त्यांची शहनिशा निवडणूक आयोग करत आहे. त्यात काही तथ्य आढळल्यास त्यांची निवड रद्द ठरून त्या जागांवर पुन्हा निवडणूक घेण्यात येऊ शकते, असे सांगितले जात आहे. यातही माघार घेणाऱ्या उमेदवारांची तक्रार असल्यास महत्त्वाची ठरणार आहे.
महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडीबाबत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक विभागाचे अहवाल राज्य निवडणूक आयोगाने मागवले होते. त्यानुसार दोन्ही अहवाल आयोगाकडे पाठवले आहेत.
- सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग, महापालिका
काय होऊ शकते?
- एखाद्या उमेदवाराविरोधात दडपशाहीचा अवलंब करून आणि आमिष दाखवून उमेदवारी मागे घेण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाल्यास कठोर कारवाई होऊ शकते
- ‘नोटा’चा (नन ऑफ द अबोव्ह : वरीलपैकी कोणी नाही) पर्याय असला, तरी त्याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने मतदारांना केवळ मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून संबंधित प्रभागामध्ये निवडणूक होणार नाही. मात्र, माघार घेतलेल्या उमेदवारांची तक्रार असल्यास आणि त्यात तथ्य आढळल्यास त्या जागेवरची निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो
असे ठरले बिनविरोध
प्रभाग ६ : धावडेवस्ती-सद्गुरूनगर भोसरी
या प्रभागातील ‘ब’ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात इतर मागासवर्गीय (ओबीसी) संवर्गासाठी राखीव आहे. या जागेवर तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये भाजपचे रवि लांडगे, अपक्ष श्रद्धा लांडगे व प्रसाद ताठे यांचा समावेश होता. त्यांतील दोन्ही अपक्षांनी उमेदवारी मागे घेतल्याने रवि लांडगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा अहवाल ‘क’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील प्रभाग दोन, सहा, आठ आणि नऊ यांची जबाबदारी असलेले निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी पाठवला आहे.
प्रभाग १० : संभाजीनगर-शाहूनगर-मोरवाडी
प्रभाग १० मधील ‘ब’ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव आहे. या जागेवर भाजपच्या सुप्रिया चांदगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गीता चव्हाण आणि अपक्ष रेणुका भोजणे व रोहिणी रासकर यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील चांदगुडेवगळता अन्य चारही महिला उमेदवारांनी माघार घेतली आहे. चांदगुडे यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. याबाबतचा अहवाल ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील प्रभाग १०, १४, १५ आणि १९ यांची जबाबदारी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी पाठवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

